For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दत्तात्रय अवतार

06:39 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
दत्तात्रय अवतार
Advertisement

नातन धर्मामध्ये भगवान विष्णूंचे दहा अवतार वर्णन केले आहेत. त्याचप्रमाणे इतर पुराणामध्येसुद्धा अनेक अवतारांचे वर्णन येते. श्रीमद भागवतमध्येसुद्धा भगवंतांच्या अवतारांचे वर्णन येते. त्यापैकी एका अवताराचे वर्णन करताना म्हटले आहे (भा 1.2.11) षष्ठमत्रेरपत्यत्वं वृत: प्राप्तोऽनसूयया । आन्वीक्षिकीमलर्काय प्रह्लादादिभ्य रूचिवान् ।। अर्थात. ‘अत्री ऋषींच्या पुत्र रूपाने परम पुरूषांनी सहावा अवतार घेतला. अनसूयेने प्रार्थना केल्यावरून तिच्या गर्भातून ते प्रकट झाले. त्यांनी अध्यात्म विषयांचे ज्ञान अलर्क, प्रह्लाद, यदु, हैहय इत्यादींना सांगितले.

Advertisement

भागवतमध्ये पुढे विस्ताराने ह्या अवताराबद्दल वर्णन येते (भा 4.1.15) अत्रे: पत्न्यनसूया त्रीञ्जज्ञे सुयशस: सुतान् । दत्तं दुर्वाससं सोममात्मेशब्रह्मसम्भवान् ।। अर्थात ‘अत्री मुनींची पत्नी अनसूया हिने भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान ब्रह्मदेव यांचे आंशिक विस्तार असणाऱ्या सोम, दत्तात्रेय आणि दुर्वास या तीन अत्यंत प्रसिद्ध पुत्रांना जन्म दिला. सोम हा भगवान ब्रह्मदेवांचा, दत्तात्रेय हा भगवान विष्णूंचा आणि दुर्वास हा भगवान शंकराचा अंशावतार होता. (भा 4.1.16) विदुर उवाच - सुरश्रेष्ठा: स्थित्युत्पत्त्यन्तहेतव: । किञ्चच्चिकिर्षवो जाता एतदाख्याहि मे गुरो ।। अर्थात ‘हे ऐकल्यानंतर विदुरांनी मैत्रेय मुनींना विचारले, हे गुरूवर्य संपूर्ण सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता असणारे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे त्रिदेव कसे काय अत्री मुनींच्या पत्नीच्या उदरी पुत्ररूपाने प्रकट झाले?  (भा 4.9.17)  मैत्रेय  उवाच-ब्रह्मणा चोदित:सृष्टावत्रिर्ब्रह्मविदां वर: । सह पत्न्या ययावृक्षं कुलाद्रिं तपसि स्थित: ।। अर्थात ‘श्री मैत्रेय ऋषी म्हणाले: ब्रह्मदेवाने जेव्हा अत्री मुनींना अनसूयेशी विवाह करून प्रजोत्पादन करण्याची आज्ञा दिली, तेव्हा अत्री मुनी आपल्या पत्नीसह खडतर तपश्चर्या करण्यासाठी ऋक्ष नामक पर्वताच्या खोऱ्यामध्ये गेले.” (भा4.1.18) तस्मिन् प्रसूनस्तबक पलाशाशोककानने ।  वार्भि: स्रवद्भिऊद् घुष्टेनिर्विन्ध्याया: समन्तत:।। अर्थात ‘त्या पर्वताच्या खोऱ्यामधून निर्विद्या नावाची एक नदी वाहते. त्या नदीच्या काठावर अनेक वृक्ष आणि पलाश पुष्पे लागलेली इतरही अनेक प्रकारची झाडे आहेत. तसेच धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा मधुर ध्वनी तेथे सदैव निर्माण होत असतो. ते पती-पत्नी त्या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचले.’ (भा 4.1.19) प्राणायामेन संयम्य मनो वर्षशतं मुनि:। अतिष्ठदेकपादेन निर्द्वन्द्वोऽनिलभोजन: अर्थात ‘तेथे त्या महर्षींनी प्राणायाम या योगपद्धतीच्या अभ्यासाद्वारे मन संयमित केले आणि त्यायोगे सर्व आसक्तीवर विजय मिळविला. वायुव्यतिरिक्त इतर काहीही भक्षण न करता ते शंभर वर्षापर्यंत तेथे एकाच पायावर उभे राहिले.’ (भा 4.1.20) शरणं तं प्रपद्येऽहं य एव जगदीश्वर:।  प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिन्तयन् ।। अर्थात ‘अत्री मुनी विचार करीत होते-मी ज्यांचा आश्र्रय घेतला आहे ते जगताचे स्वामी, अगदी त्यांच्यासारखाच पुत्र मला देण्याची कृपा करण्यास प्रसन्न होवोत (भा 4.1.21) तप्यमानं त्रिभुवनं प्राणायामैधसाग्निना। निर्गतेन मुनेर्मूर्ध्न: समीक्ष्य प्रभवस्त्रय: ।। अर्थात ‘अत्री मुनी जेव्हा उग्र तपश्चर्या करण्यात मग्न झालेले होते, तेव्हा त्यांच्या प्राणायामाच्या अभ्यासाच्या प्रभावामुळे एक प्रखर अग्निज्वाळा त्यांच्या मस्तकामधून बाहेर आली आणि ती ज्वाला त्रिभुवनातील तीन प्रमुख देवतांनी पाहिली. (भा 4.1.22) अप्सरोमुनिगन्धर्वसिद्धविद्याधरो रगै: । वितायमानयशसस्तदाश्र्रमपदं ययु: ।। अर्थात ‘त्यावेळी अत्री मुनींच्या आश्र्रमात तीन देव आले. त्यांच्यासमवेत अप्सरा, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग यासारखे स्वर्गलोकातील निवासी होते. अशा रीतीने आपल्या तपश्चर्येच्या प्रभावाने प्रसिद्ध झालेल्या त्या महर्षींच्या आश्र्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. (भा 4.1.23) तत्प्रादुर्भावसंयोगविद्योतितमना मुनि:। उत्तिष्ठन्नेकपादेन ददर्श विबुधर्षभान्।। अर्थात अत्री ऋषी एका पायावर उभे राहिले होते, परंतु ज्या क्षणी त्यांनी पाहिले की, तीन प्रमुख देव आपल्यासमोर अवतरले आहेत त्याक्षणी त्या सर्वाना एकत्रित पाहून ते इतके अत्यानंदित झाले की, अपार कष्ट होत असूनसुद्धा ते एका पायावर त्यांच्याकडे आले (भा4.1.24) प्रणम्य दण्डवद्भूमावुपतस्थेऽर्हणाञ्जलि:। वृषहंससुपर्णस्थान् स्वै: स्वैश्चिह्न:श्च चिह्नितान् ।। अर्थात ‘निरनिराळ्या म्हणजे बैल, हंस आणि गऊड या वाहनांवर बसलेल्या तीन देवतांची नंतर त्यांनी प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. त्या देवतांनी आपल्या हातात डमरू, कुश गवत आणि चक्र धारण केले होते. एखाद्या दंडाप्रमाणे खाली पडून नमस्कार घालीत त्यांना आपली आदरांजली अर्पण केली.’

(भा 4.1.25) कृपावलोकेन हसद्वदनेनोपलम्भितान्। तद्रोचिषा प्रतिहते निमील्य मुनिरक्षिणी अर्थात ‘ते तिन्ही देव आपल्यावर कृपावंत झालेले पाहून अत्री ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांच्या शरीरांच्या प्रखर तेजाने अत्री ऋषींचे डोळे दिपून गेले आणि म्हणून काही काळ त्यांनी आपले डोळे मिटून घेतले’ (भा 4.1.26) चेतस्तत्प्रवणं युञ्जन्नस्तावीत्संहताञ्जलि:। श्लक्ष्णया सूक्तया वाचा सर्वलोकगरीयस:।। अर्थात देवांनी अत्री ऋषींचे चित्त आकृष्ट करून घेतले असल्याने, कसे तरी करून अत्री ऋषींनी स्वत:ला सावरून घेतले आणि हात जोडून व मधुर शब्दांनी त्यांनी विश्वाच्या त्या अधिष्ठात्री देवतांची प्रार्थना आरंभिली. (भा4.1.27) अत्रिरूवाच-विश्वोद्भवस्थितिलयेषु विभज्यमानै-र्मायागुणैरनुयुगं विगृहीतदेहा: । ते ब्रह्मविष्णुगिरिशा: प्रणतोऽस्म्यहं व-स्तेभ्य: क एव भवतां म इहोपहूत:।। ऋषीश्रेष्ठ अत्री म्हणाले : हे भगवान ब्रह्मदेव, हे भगवान विष्णू आणि हे भगवान शिव, तुम्ही भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांचा स्वीकार करून स्वत:ला तीन देहांमध्ये विभक्त करून घेतलेले आहे. प्रत्येक युगात या सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय यासाठी तुम्ही असे करता. मी तुम्हा सर्वांना सादर प्रणाम करतो आणि हे विचारण्यासाठी अनुमती मागतो की, तुम्हा तिघांपैकी कोणास मी माझ्या प्रार्थनेने बोलाविले आहे? (भा 4.1.28) एको मयेह भगवान्वीविधप्रधानै- श्चित्तीकृत: प्रजननाय कथं नु यूयम् । अत्रागतास्तनुभृतां मनसोऽपि दूराद्ब्रूत प्रसीदत महानिह विस्मयो मे।। भगवंतासमानच पुत्राची इच्छा चित्तामध्ये धरून मी त्यांना निमंत्रित केले आणि मी केवळ त्यांचेच चिंतन केले, परंतु ते मनुष्याच्या मानसिक तर्कशक्तीच्या फार पलीकडे असूनही तुम्ही तिघेही येथे प्रकट झाला आहात. तुम्ही कसे या ठिकाणी आला आहात, हे कृपया मला सांगावे, कारण या गोष्टीमुळे मी अत्यंत गोंधळून गेलो आहे. त्यावर तिन्ही देवता म्हणाले (भा 4.9.31) अथास्मदंशभूतास्ते आत्मजा लोकविश्रुता:। भवितारोऽङ्ग भद्रं ते विस्रप्स्यन्ति च ते यश:।। अर्थात ‘आमच्या सामर्थ्याचे आंशिक प्रतिनिधित्व करतील असे पुत्र तुला होतील आणि आम्ही तुझे कल्याण इच्छित असल्याकारणाने, ते पुत्र जगभर तुझ्या कीर्तीचा महिमा वाढवतील. (भा 4.1.33) अर्थात ‘त्यानंतर ब्रह्मदेवांचा आंशिक प्रतिनिधित्वापासून चंद्रदेवाचा त्यांच्या उदरी जन्म झाला, श्री विष्णूंचा आंशिक प्रतिनिधित्वापासून महान योगी दत्तात्रयांचा जन्म झाला, शंकराच्या आंशिक प्रतिनिधित्वापासून दुर्वास मुनींचा जन्म झाला. अशा प्रकारे भगवंतांनी आपले भक्त अत्री ऋषी आणि अनसूया यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पुत्र म्हणून दत्तात्रय अवतार धारण केला. तुकाराम महाराज अशा दत्तात्रयांची स्तुती करताना म्हणतात, तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत।।1।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।2।। माथां शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ।।3।। शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।।4।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।5।। अर्थात ‘ज्याला तीन मस्तके आणि सहा हात आहेत अशा दत्तात्रयाला माझा दंडवत. त्यांच्या काखेत झोळी आणि पुढे श्वान उभे आहेत, जे गंगेमध्ये स्नान करतात, त्याच्या मस्तकावर जटाभार शोभतो आहे आणि अंगावर विभूती लेप केला आहे, हातात शंख, चक्र, गदा इत्यादी आहेत आणि पायामध्ये खडावा गर्जत आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, अशा त्या दिगंबर दत्ताला माझा नमस्कार.

Advertisement

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.