For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात दत्तजयंती भक्तिभावाने

10:49 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात दत्तजयंती भक्तिभावाने
Advertisement

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष : पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी दत्त जयंती भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. काकडारती, लघुरुद्राभिषेक, पूजा, महाआरती, तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दत्त मंदिरांवर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासूनच दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. शहरातील मारुती गल्ली दत्त मंदिर, आनंदनगर-वडगाव, माधवपूर-वडगाव, शांतीनगर, टिळकवाडी, गोंधळी गल्ली, कलमेश्वर गल्ली-अनगोळ, कपिलेश्वर मंदिर, अनगोळ-दत्त मंदिर, कामत गल्ली दत्त मंदिर, दत्त गल्ली-वडगाव, महात्मा फुले रोड-शहापूर आदी ठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भजन, प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. अभिषेक, गुरुचरित्र पारायण, आरती, पाळणा, मंत्रपुष्प, जागर, तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादही आयोजित करण्यात आला होता. विशेषत: आरती आणि जन्मोत्सवासाठी भक्तांची गर्दी झाली होती.

कलमेश्वर गल्ली, अनगोळ

Advertisement

कलमेश्वर गल्ली, अनगोळ येथे दत्त मंदिरात पहाटे काकडारती, अभिषेक, भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला. जन्मोत्सवानंतर तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी स्वरगंधा म्युझिकल ग्रुपतर्फे भक्तिसंगीत कार्यक्रम पार पडला. बुधवारी पहाटे काकडारती, पालखी सेवा मिरवणूक काढली जाणार आहे. गुरुवारी काकडारती, लघुरुद्राभिषेक, पूजा, महाआरती व महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.

गोंधळी गल्ली

सकाळी 8 वाजता अभिषेक तर सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. यमुनाक्का महिला मंडळातर्फे पाळणागीत सादर करण्यात आले. रात्री 8 वाजता महाआरती व रात्री 9.30 वाजता संगीत खुर्ची स्पर्धा पार पडली. यावेळी गल्लीतील नागरिक, महिला मंडळ उपस्थित होते. बुधवार दि. 27 रोजी सकाळी 8 वाजता अभिषेक, सायंकाळी 5 वाजता झंकार महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी 7 वाजता मंत्र पुष्पांजली होणार आहे.

शांतीनगर-टिळकवाडी

शांतीनगर-टिळकवाडी येथील दत्त मंदिरात सकाळी 7.30 वाजता नित्यपूजा, 8.30 ते 11.30 वाजता श्री दत्त याग, दुपारी 12 वाजता श्रींची महापूजा व अभिषेक, सायंकाळी 6.14 श्रींचा जन्मोत्सव, पाळणा, आरती, मंत्रपुष्प व जागर कार्यक्रम झाला. बुधवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता श्री सत्यदत्त पूजन, 11 वाजता महापूजा व आरती, दुपारी 12.30 वाजता श्रींचा महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता श्रींची पालखी सेवा, नगरप्रदक्षिणा व रात्री 7.30 वाजता आरती व मंत्रपुष्प होणार आहे.

महात्मा फुले रोड, शहापूर

महात्मा फुले रोड, शहापूर येथील दत्त मंदिरात मंगळवारी सकाळी 7.30 वाजता महाअभिषेक तर सायंकाळी 6.15 वाजता दत्तगुरुंचा पाळणा आणि त्यानंतर महाआरती करण्यात आली. रात्री 8 वाजता भजनाचा कार्यक्रम पार पडला.

बापट गल्ली-कार पार्किंग

बापट गल्ली-कार पार्किंग येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त दुपारी 12 वाजता लघुरुद्राभिषेक व सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सव काळ साजरा करण्यात आला. सायंकाळी 6.30 वाजता भक्ती सांस्कृतिक महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Advertisement
Tags :

.