शहर परिसरात दत्तजयंती भक्तिभावाने साजरी
बेळगाव : ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या भक्तिगीतांच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात अत्यंत भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. काही ठिकाणी बुधवारी तर काही ठिकाणी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. आनंदनगर-वडगाव येथील दत्त मंदिरतर्फे दि. 4 रोजी श्री दत्तमूर्ती अभिषेक व दत्त जयंती सोहळा झाला. रात्री 8.30 वा. दत्त जन्मोत्सव झाला. शुक्रवारी दुपारी 1 ते 4 महाप्रसाद होणार आहे.
पारिजात कॉलनी, अनगोळ येथील दत्त मंदिरात गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी 7 वाजता झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी गर्दी केली. जुन्या पी. बी. रोडवरील श्रीदत्त त्रिपुरसुंदरी मठामध्ये सकाळी 10.30 वाजता श्रीसिद्ध कमलपादुका रुद्राभिषेक झाला. दुपारी 1 वाजता महाआरती होऊन दीड वाजल्यापासून महाप्रसाद झाला. कार पार्किंग, कडोलकर गल्ली येथील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत रुद्राभिषेक झाला. यानंतर 12 ते 3 भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रसाद वितरण झाले.
श्री क्षेत्र दत्त मंदिर, गोवावेस येथे दत्त जयंतीच्यानिमित्ताने प्रथमच अमरनाथ सजावट करण्यात आली. याठिकाणी अमरनाथ गुंफा व अमरनाथ शिवलिंग साकारण्यात आले आहे. दर्शनासाठी भक्तांची उशिरापर्यंत गर्दी झाली होती. महात्मा फुले रोड, शहापूर येथील दत्त मंदिर सेवा प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी 7.15 वा. महाअभिषेक केला. सायंकाळी दत्तगुरुंचा पाळणा झाल्यानंतर रात्री 8 वाजता भजनाचा कार्यक्रम झाला. समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी 8 वा. नित्यपूजा, अभिषेक, सायंकाळी 6 वा. जन्मोत्सव, पाळणा, आरती व तीर्थप्रसाद झाला. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी 3 ते 4.30 यावेळेत सिद्धकला भजनी मंडळाचे भजन झाल्यानंतर हभप गीता देशपांडे यांचे दत्त जन्मोत्सवावर कीर्तन झाले.
गोंधळी गल्ली
येथील ग़ोंधळी गल्लीतील दत्त मंदिरात गुऊवारी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी अभिषेक, सायंकाळी यमुनाक्का महिला भजन मंडळातर्फे पाळणागीते सादर झाली. त्यानंतर जन्मोत्सव, रात्री महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला.
गुरुदत्त दिगंबर सेवा संघातर्फे आज महाप्रसाद
जीआयटी राजारामनगर उद्यमबाग येथील गुरुदत्त दिगंबर सेवा संघातर्फे दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी कार्यक्रम झाले. शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी 7.15 वा. गुरुदत्त याग, 9 वा. महाआरती, दुपारी 12 ते 3 पर्यंत महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
अनगोळमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमअनगोळ, बाबले गल्ली येथील श्री गुरुदत्त सेवा संघ, श्री दत्तमंदिर यांच्यावतीने दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवारी हे कार्यक्रम होणार असून रविवार दि. 7 रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ज्या भाविकांना महाप्रसादासाठी मदत करायची आहे त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.