यल्लम्मा डोंगरावर वर्षभरात दासोह भवन उभारू
श्री रेणुका देवीच्या दर्शनावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे आश्वासन : विविध विकासकामांचे उद्घाटन
बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा डोंगर एक ऐतिहासिक पुराणकालीन मंदिर आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना निवास, पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधा पुरविण्यात येतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. डोंगरावर रविवारी पर्यटन खात्याच्यावतीने 22 कोटी 45 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली इमारत, निवासी इमारत, उद्यान व व्यापारी संकुल, अतिथीगृहाचे उद्घाटन करून ते बोलत होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व नेत्यांनी श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर रेणुका यल्लम्मा देवी प्राधिकारणाच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर विविध विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना सिद्धरामय्या पुढे म्हणाले, 1 हजार 87 एकर जमीन उपलब्ध असूनही आजवर पायाभूत सुविधा पुरविणे शक्य झाले नाही. या पवित्र ठिकाणाच्या विकासासाठी योजना तयार करण्यात आली आहे. डोंगरावर स्वच्छता राखण्याचे आवाहन करतानाच पुढील वर्षभरात दासोह भवन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.