For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात दसरोत्सव-सीमोल्लंघन उत्साहात

12:55 PM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात दसरोत्सव सीमोल्लंघन उत्साहात
Advertisement

पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणुका : हजारो भाविकांनी सोने लुटण्याचा घेतला आनंद

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्यात शनिवारी दसरोत्सव व सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. गावागावांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आल्या. हा दसऱ्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सीमोल्लंघन करताना पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून आपट्याची पाने वाटून सोनं घ्या... सोन्यासारखे रहा... अशा एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्याच्या विविध गावांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम झाले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. विविध जागृत मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस दिवे तेवत ठेवण्यात आले होते. मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्याचबरोबर फुलांची सजावट केली होती. या मंदिरांमध्ये रोज पहाटे काकड आरती, दिवसभर विविध भजन व कार्यक्रम, काही मंदिरांमध्ये सायंकाळी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम झाले.

Advertisement

बहुतांशी गावांमध्ये शनिवारी सकाळी खंडेपूजन करण्यात आले. खंडेपूजनसाठी शेतकऱ्यांनी शस्त्रांना चुना लावून ऊस बांधून विधीवत व पारंपरिक पद्धतीने पूजा केली. तसेच कामगार वर्गाने आपापल्या मशिनरी व शस्त्रांची पूजा केली. शनिवारी दसरोत्सवानिमित्त गावागावातील मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती. बऱ्याचशा मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. तर आपट्याची पाने देऊन एकमेकांना सोनं घ्या... सोन्यासारखे रहा...अशा शुभेच्छा देण्यात आल्या. नावगे रामलिंग मंदिरासमोर गावचे इनामदार देसाई यांच्या हस्ते पूजा करून संपूर्ण गावच्या वतीने रामलिंग व भैरवनाथ मंदिरासमोर गाऱ्हाणा कार्यक्रम झाला. त्यानंतर भक्तांनी मंदिराच्या समोरून नारळ उडविण्याचा कार्यक्रम केला. यामध्ये या आगळ्यावेगळ्या परंपरेचा अनेकांनी आनंद लुटला. तसेच हर हर महादेवाच्या गजरात मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगुंदी रवळनाथ मंदिरात महाआरती

वाघवडेत गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत तऊणांचा व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसून आला. बेळगुंदीत रवळनाथ मंदिरात महाआरती करून दसऱ्याचा पूजाविधी करण्यात आला. यावेळी पुजारी गुरव डोक्यावर दिवा घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मच्छे, बाळगमट्टी गावातही मोठ्या जल्लोषात पालखी मिरवणूक काढली. पिरनवाडी, झाडशहापूर, देसूर, संतिबस्तवाड, किणये, कर्ले, राकसकोप, येळेबैल, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी भागात पारंपरिक पद्धतीने दसऱ्याचा सण साजरा करण्यात आला.

होनगामध्ये विजयादशमी साजरी

येथे श्री काळभैरवनाथ देवस्थान विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी पार पडला. अष्टमीला श्री काळभैरवनाथ देवाची पानपूजा ग्रामस्थ भाविकांच्या वतीने बांधण्यात आली. परगावाहून येणाऱ्या माहेरवासिनींनी पानपूजेचा मान घेऊन मोठ्या भक्तिभावाने देवाचे दर्शन घेतले. धार्मीक विधी हक्कदार व भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. शुक्रवारी खंडेनवमी दिवशी बन्नीचे पूजन करण्यात आले. शनिवारी विजयादशमी दिवशी भैरवनाथ मंदिराच्या उत्तर दिशेला असलेल्या सीमेवरील शेतात शमीच्या झाडाचे पूजन करून सोने लुटण्याचा धार्मीक विधी पार पडला.

येळ्ळूर परिसरात पारंपरिक पद्धतीने

साडेतीन मुहुर्तापैकी एक असणारा दसरा सण सालाबादप्रमाणे याहीवर्षी येळ्ळूर व परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. नऊ दिवस सुरू असणाऱ्या दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने भगव्या पताका, तोरणे आणि रांगोळ्यानी येळ्ळूरसह सुळगा, देसूर, राजहंसगड सजले होते. येळ्ळूरमध्ये पाच ते सहाशे धारकऱ्यांच्या बुलंद आवाजाने वातावरण शिवमय झाले होते. त्यानंतर घरोघरी पारंपरिक पध्दतीने शस्त्रपूजन होवुन खंडेपूजन झाले. राजहंसगडावरील सिध्देश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आबालवृद्ध व तरुणांनी गर्दी केली होती. सांयकाळी पालखी परत चांगळेश्वरी मंदिरात आल्यावर सिमोल्लंघनाचा सोहळा पार पडला.

राजहंसगडावर दसरोत्सव परंपरेनुसार साजरा

राजहंसगड (किल्ल्यावर) प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा उत्सव परंपरेप्रमाणे भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार दि. 12 रोजी सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात देवाला अभिषेक घालून विधिवत पूजन कयण्यात येवून सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या उपस्थितीत महाआरती झाली. याप्रसंगी आरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आरती झाल्यानंतर पंचक्रोषीतील राजहंसगड, देसूर, वडगाव, शहापूर, येळ्ळूर, नंदिहळ्ळी, गर्लगुंजी आदि भागातून भाविकांची गडावर उपस्थिती होती. सायंकाळी परंपरेनुसार पालखी तळ्यावर आणण्यात येवून पूजन करण्यात येऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. हा दसरा उत्सव श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच व गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

Advertisement
Tags :

.