दर्शनची जामीन याचिका फेटाळली
रेणुकास्वामी खून प्रकरणी पवित्रागौडासह चौघांची निराशा : दोघांना जामीन
बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणातील आरोपी क्र. 1 पवित्रागौडा, आरोपी क्र. 2 अभिनेता दर्शन, तसेच नागराज, लक्ष्मण यांची निराशा झाली आहे. त्यांची जामीन याचिका बेंगळूरमधील 57 व्या अतिरिक्त शहर आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे दर्शन याने मंगळवारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, खून प्रकरणातील अन्य दोन आरोपी रविशंकर आणि दीपक यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. रेणुकास्वामी खून प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर दर्शनने जामिनासाठी अर्ज केला होता. बेंगळूरमधील 57 व्या अतिरिक्त शहर व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. जयशंकर यांच्यासमोर दीर्घ सुनावणी झाली. 10 रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
दर्शनला 11 जूनला अटक
पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठविल्यामुळे रेणुकास्वामी याला चित्रदुर्गहून बेंगळूरला आणून दर्शन आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 11 जून रोजी पोलिसांनी दर्शनला म्हैसुरात अटक करून बेंगळूरला आणले. येथील परप्पन अग्रहार कारागृहात त्याची शाही बडदास्त ठेवण्यात आल्याचे उघडकीस येताच त्याला बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. अन्य आरोपींनाही राज्यातील विविध कारागृहांमध्ये हलविण्यात आले.