Satara : राष्ट्रीय महामार्ग विभागाचा रात्री अंधार, दिवसा उजेड!
विद्यानगर–ओगलेवाडी महामार्गावरील स्ट्रीटलाईट बंद
कराड : विद्यानगर-ओगलेवाडी महामार्गाच्या दुभाजकात बसवण्यात आलेल्या स्ट्रीटलाईटच्या स्वयंचलित यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने ही यंत्रणा दिवसा सुरू रहात असून रात्रीच्या वेळी बंद राहिल्याने महामार्गावर अंधाराचे साम्राज पसरत आहे. यातील निम्मे एलईडी लॅम्प बंद पडले आहेत. यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महमार्ग विभागाने सुमारे एक कोटी सहा लाख रुपयांचा निधी खर्चुन गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विद्यानगर ते करवडी फाटा दरम्यान महामार्गाच्या दुभाजकात स्ट्रीट लाईट यंत्रणा बसवली आहे. सैदापूर, गोवारे, हजारमाची व विरवडे या चार ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण१०३ खांब आहेत. प्रत्येक खांबावर १२० वॅटचे दोन एलईडी लॅम्प आहेत. महामार्गाच्या दोन्ही लेनवर प्रकाश पडेल असे व्यवस्थापन करण्यात आले आहे.दुदैवाने ही स्ट्रीट लाईट यंत्रणा बसवल्यापासूनच वारंवार बिघाड होत आहे.
त्यामुळे या संपूर्णकामाच्या चौकशीची वारंवार मागणीही करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेला ठेकेदार इकडे फिरकत नाही, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय कोल्हापूर असून अधिकारीही इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल उपस्थित होत आहे.
ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित असून वारंवार त्यामध्ये बिघाड होत आहे. सध्या या स्ट्रीट लाईट रात्री बंद तर दिवसा सुरू रहात आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर काळोखाचा सामना करावा लागत आहे. सैदापूरसह गोवारे, हजारमाची व विरवडे हद्दीतील जवळपास निम्मे एलईडी लॅम्प बंद आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने गेलेले एलईडी लॅम्प बसवावेत तसेच स्वयंचलित यंत्रणेतील बिघाड दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.