ऑस्ट्रेलियन संघात डार्सी ब्राऊनचा समावेश
वृत्तसंस्था/मेलबोर्न
संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकट स्पर्धेसाठी सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यांचा ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर केला असून त्यामध्ये डार्सी ब्राऊनचा समावेश केला आहे.
आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात घेतली जाणार होती. पण बांगलादेशमधील राजकीय तणावग्रस्त परिस्थितीमुळे ही स्पर्धा आयसीसीने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी ऑस्ट्रेलियन संघातील डार्सी ब्राऊनला दुखापत झाली होती. तिच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. पण तिची ही दुखापत आता बरी होण्याच्या मार्गावर असल्याने निवड समितीने तिचा या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत सहभागी न झालेली जेस जोनासनला मात्र या आगामी स्पर्धेसाठी वगळण्यात आले आहे. सोफी मॉलिन्युक्स आणि ग्रेस हॅरिस यांनाही किरकोळ दुखापती झाल्या असल्या तरी त्या लवकरच पूर्ण तंदुरुस्त होतील, या हेतुने त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघातील नवोदित फलंदाज लीचफिल्ड हिची ही आगामी पहिलीच टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे नेतृत्व अॅलिसा हिलीकडे सोपविण्यात आले आहे. हिलीने आपल्या नेतृत्वाखालील यापूर्वी तीनवेळा महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली असून आता ती चौथ्यांदा सलग आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. ताहिला मॅकग्रा आणि लिचफिल्ड हे दोन खेळाडू ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख असून त्यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल. 3 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा महिला संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून या मालिकेला 19 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अ गटात समावेश असून या गटामध्ये न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, लंका यांचा सहभाग आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 3 ऑक्टोबरला इंग्लंडबरोबर होईल.
ऑस्ट्रेलियन महिला संघ: अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राऊन, अॅश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अॅलेना किंग, फोबे लिचफिल्ड, ताहिला मॅकग्रा, सोफी मॉलिन्युक्स, बेथ मुनी, इलेसी पेरी, मेगन स्कूट, अॅनाबेल सदरलँड तायला व्हॅलेमिनेक आणि जॉर्जिया वेरहॅम.