दापोलीच्या साईप्रसादची राज्यस्तरापर्यंत ‘धाव’
क्रीडा क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा, आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारण्याची मनीषा
क्रीडा प्रकारात आपला योग्य गुरू असेल तर आपण आपल्या इच्छाशक्तीवर जगावरही राज्य करू शकतो हे दापोलीच्या साईप्रसाद वराडकर याने धाणे क्रीडा प्रकारातील यशाने सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातून भरारी घेत या क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत आपले नाव कोरले आहे. घोड्यासारखी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साईप्रसादने वेगाने धाऊन पदरात सुवर्ण, सिल्वर, सन्मानचिन्ह, रोख पारितोषिके पटकावत आहे. त्याची क्रीडा क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मनीषा तो बाळगून आहे. दापोलीतील आसूद तुलसीआळी येथील रहिवासी असलेला साईप्रसाद उत्पल वराडकरला लहानपणापासून खेळण्याची आवड. त्यामुळे त्याने इ. 7 वीमध्ये असताना कराटे क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. परंतु साईप्रसाद जरी कराटे प्रकारात प्रशिक्षण घेत असताना तो धावण्यात देखील तरबेज असल्याचे त्याला प्रशिक्षण देणाऱ्या संदेश चव्हाण यांनी ओळखले. त्यानंतर साईप्रसाद हा धावणे या क्रीडा प्रकारात उतरला आणि आजघडीला त्याने राज्यस्तरापर्यंत वेगवान दौड घेत अनेक पदके मिळवत आपले कौशल्य दाखवून दिले आहे.
साईप्रसाद हा सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी येथे दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका रूतू मेहता यांचे नेहमीच मार्गदर्शन, सहकार्य लाभत असते. तसेच मुख्य म्हणजे या यशाबद्दल आई-&वडीलाबरोबरच प्रशिक्षक संदेश चव्हाण यांचा यात सिंहाचा वाटा असल्याचे साईप्रसाद सांगतो. साईप्रसाद हा नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभे राहून मुजरा करुनच पुढे जातो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यावर तो नेहमीच व्याख्याने देखील देतो.
त्याला सायकलींगचे देखील वेड
साईप्रसाद हा विविध क्रीडा प्रकारात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या धावणे या क्रीडा प्रकारात सहभाग घेवून यश संपादन करत असला तरी तो सायकलींग देखील करतो. त्याने इंडो अॅथलेटिक सोसायटी पुणे ते पंढरपूर सायकल राइड 250 कि. मी. प्रवास 10 तासात पूर्ण केला. रायगड प्रदक्षिणा 72 कि. मी., किंग ऑफ कुंभार्ली सायकल राईड अशा अनेक सायकलींग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय लाठी स्पर्धा, जिल्हास्तरीय पिंच्याक सिलेंट, टोयकन इंटरनॅशनल कराटे तसेच बॉडिबिल्डींग, त्याचबरोबर त्याला मल्लखांबची, वक्तृत्व स्पर्धांमध्ये देखील भाग घेतो.
आंतरराष्ट्रीयस्तरावर दापोलीचा झेंडा रोवणार
आई-वडील तसेच गुरुंच्या योग्य मार्गदर्शनामुळे क्रीडा प्रकारात आपल्याला चांगले यश मिळत आहे. यामुळे आता क्रीडा क्षेत्रातच करीअरची इच्छा आहे. या इच्छेला कष्टाची जोड देत मोठी झेप घेवून दापोलीचा झेंडा अंतर राष्ट्रीयस्तरावर रोवण्याचा मानस असल्याचा मानस असल्याचे साईप्रसाद वराडकरने ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले.
- प्रतिक तुपे, दापोली