दापोलीचा मार्शल आर्टमध्ये राज्यस्तरावर झेंडा
संदेश चव्हाण यांची कौतुकास्पद कामगिरी
मैदानी खेळामधली आपली आवड जोपासत मार्शल आर्ट्स या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा पदके मिळवून संदेश चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे नाव उंचावले आहे. मार्शल आर्टबरोबरच मॅरेथॉन, सायकल, रोप स्किपिंग, स्केटींग, योगा अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदके प्राप्त करणारा हा गुणी खेळाडू क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेतून नवीन पिढी घडवण्याचेही कार्य करीत आहे. यामुळे संदेश यांची क्रीडा क्षेत्रातील एकूणच कामगिरी दापोलीचे नावलौकीक उंचावणारी ठरली आहे. संदेश चव्हाण यांनी कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विद्यापीठातून आपले पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून तो एम.ए.एम.पी.एड आहेत.
त्यांनी डेहराडून आणि जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत दोन वेळा रौप्य पदक मिळवून आपली राष्ट्रीय स्तरावरील क्षमता सिद्ध केली. त्याचबरोबर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देखील निवड झाली होती. ऑल इंडिया कार्ल अर्नीस मार्शल आर्ट फेडरेशनच्यावतीने मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. तर सन 2012 साली पुणे बालेवाडी येथे झालेल्या ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला. शैक्षणिक स्तरावर चंदीगड येथील ताऊदेवीलाल स्टेडियम येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी ब्लॅक बेल्ट फर्स्ट परीक्षेत प्रथम श्रेणीत येण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी रोप स्किपींग आणि मैदानी स्पर्धेची राज्य पंच परीक्षेत उत्तीर्ण केली असून, ब्लॅक बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका
केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर एक कुशल मार्गदर्शक म्हणूनही संदेश चव्हाण कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात क्रीडा संचालक म्हणून काम केले असून, आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संघाचे टीम मॅनेजर म्हणून भूमिका बजावली आहे. त्यांनी अनेक गुणवान विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. शिवाय आता देखील खेळत आहेत. ‘राजे स्पोर्ट्स‘ या संस्थेच्या माध्यमातून दापोली येथे ते अनेक खेळाडूंना सध्या क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. ज्यामुळे क्रीडा क्षेत्राला नवीन नव्या उमेदीचे खेळाडू मिळत आहेत. तसेच ते राजे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण देतात.
अनेक स्पर्धांमध्ये सहभाग
संदेश चव्हाण यांनी मॅरेथॉन, सायकल, रोप स्किपींग, मार्शल आर्ट, स्केटींग, योगा अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदके मिळवून महाविद्यालयासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील मिळवून आणली आहे. साहसी खेळातही त्यांनी किल्ले रायगडची सायकल परिक्रमा यशस्वी केली आहे. त्यांचा अजय ललवाणी नावाच्या अंध खेळाडूस सायकलद्वारा संपूर्ण भारतभर 45 दिवसात 7200 कि.मी प्रवास करुन आणणाऱ्या चमूमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
अनेक पुरस्कारंचे मानकरी
क्रीडा क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेषत: फीनिक्स स्पोर्ट अँड कल्चरल अॅक्टिव्हिटी फाऊंडेशन आणि रोलर स्केटिंग क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने त्यांना क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. चिपळूण शहानूर बाबा संस्थेच्या वतीने अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. संदेश चव्हाण यांनी लोणावळा, पुणे, पंजाब, राजस्थान आणि मणिपाल यासारख्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत देखील सहभाग नोंदवला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांचा सन्मान केला. चव्हाण यांनी नुसते राज्य -राष्ट्रीय खेळाडू बनवून न थांबता त्यांना आपल्या सारखे क्रीडा शिक्षक बनवले असून आज ते शाळा महाविद्यालयामध्ये राज्य-राष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांच्या शालेय जीवनात लक्ष्मण मराठे, विष्णू गोडसे आणि प्रशिक्षक म्हणून प्रथमेश दाभोळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
मैदानी खेळ खेळा
बरीचशी युवापिढी मोबाईलमध्ये व्यस्त दिसून येते, मोबाईलवर खेळ खेळत राहते. यामुळे नुकसान आहे. परंतु मैदानात विविध खेळ खेळावे, ज्यामुळे आरोग्य चांगले रहाते. शिवाय आपल्या खेळाडू वृत्तीमुळे अनेक जिल्हा, राज्य, आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत विविध संघांमधून खेळता येते. शिवाय अनेक फायदे देखील मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून मैदानी खेळात सहभागी व्हा, असे आवाहन देखील संदेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
- प्रतीक तुपे, दापोली