आंतरराष्ट्रीयस्तरावर फडकावला दापोलीचा झेंडा
आदी भांबीडचे लाठी-काठी क्रीडाप्रकारात दैदिप्यमान यश,कराटेसह मल्लखांबमध्ये राज्यस्तरावर चमक
- प्रतिक तुपे, दापोली
लहान वयातच मुलांवर मैदानी खेळाचे संस्कार होत राहीले तर ही मुले मैदाने गाजवतात व पुढेही गाजवत रहातील याचा प्रत्यय दापोलीच्या आदी भांबीड या 12 वर्षीय खेळाडूने दाखवून दिला आहे. आदीने दापोलीचा झेंडा लाठीकाठी या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीयस्तरावर रोवला आहे. शिवाय त्याने लाठीकाठी, कराटे मल्लखांब या स्पर्धेत राज्यस्तरावर तालुक्याचे नाव कोरले आहे. दापोली शहरालगत असलेल्या जालगाव-पांगारवाडी गावातील आदी अमर भांबीड याने 2021पासून क्रीडाक्षेत्रात पदार्पण केले. त्याने नेहमी आपल्या लाठीकाठीच्या सरावरासाठी सज्ज राहून आज त्याने आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचवले आहे. इ. 5वीमध्ये शिक्षण घेत असताना त्याने लाठीकाठीत या क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. प्रथम नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेत यश मिळविले. त्यानंतर दिल्ली व नंतर दापोलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवून पदके आपल्या पदरात पाडून घेतली. त्यानंतर गोवा येथे झालेल्या आंतराष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत देखील आपला दबदबा दाखवून देत दापोलीसह आपल्या यशाचा झेंडा मजबूत यशासह रोवला.
सध्या मुलं मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्त असताना आदी हा मैदानी खेळांना आपलेसे करत आहे. मोबाईलवर गेम खेळून आपल्यात काहीच बदल होणार नसून त्याचा आरोग्याला व आयुष्याला काहीच फायदा नसल्याचे देखील तो सांगतो. शिवाय लाठीकाठी, मल्लखांब तर रनिंगमध्ये किंवा प्रत्येकाच्या आवडत्या खेळामध्ये घोडदौड महत्वाची आहे. मैदानाकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यातले नुकसान असून मोबाईलवरचे गेम सोडून मैदानी गेम खेळण्याकडे लक्ष दिले तर उत्तम आरोग्य शिवाय आयुष्यात पुढे जाण्याची ताकद मिळते असे आदी सांगतो. एकंदरीत लहानपासूनच क्रिडाक्षेत्राची आवड निर्माण असेल तर भविष्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये आवड निर्माण होते हे आदीने लाठी काठी, मल्लखांब व आता रनिंगमध्ये असणाऱ्या रूचीतून स्पष्ट होते.