For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या रेल्वेगेटवर दुचाकीस्वारांचा विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास

10:43 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या रेल्वेगेटवर दुचाकीस्वारांचा विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास
Advertisement

इतर वाहनचालकांच्या जीवालाही धोका

Advertisement

बेळगाव : वाहतूक कोंडी कमी करावी, या उद्देशाने रहदारी पोलिसांनी टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स लावले आहेत. तरीदेखील काही बेदरकार वाहनचालक बॅरिकेडमधून वाट काढत उलट्या दिशेने वाहने हाकत असल्याने एकूणच वाहतूक व्यवस्था धोकादायक बनली आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाने उपाययोजना करून चालणार नाही. तर सर्वसामान्यांनाही नियमांची अंमलबजावणी करणे जरुरीचे आहे.

मागील अनेक वर्षांपासून पहिले रेल्वेगेट येथे रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावण्यात आले. यामुळे टिळकवाडीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पहिल्या रेल्वेगेटमधून काँग्रेस रोडवर विरुद्ध दिशेने वाहनचालक प्रवास करत असतात. अनेक दुचाकीचालक असा उलटा प्रवास करत आहेत. यामुळे काहींना अपघातही झाले आहेत. तरीदेखील काही अंतर व वेळ वाचविण्यासाठी जीव धोक्यात घेऊन हा प्रवास केला जातो. काँग्रेस रोडवरून भरधाव येणारी वाहने समोरासमोर धडकल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

Advertisement

प्रत्येक वाहनचालकाने खबरदारी घेणे जरुरीचे

काही दिवसांपूर्वीच रहदारी पोलिसांनी पहिले रेल्वेगेट येथे रेल्वेगेटमध्ये प्रवेश करण्यासाठी बॅरिकेड्सचे कडे उभारले आहे. यातून केवळ दुचाकी व चारचाकी वाहनेच ये-जा करू शकतात. यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रण करण्यात रहदारी पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. असे असतानाही या बॅरिकेड्समधून वाट काढत काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेचा प्रवास सुरूच ठेवला आहे. केवळ पोलीस कारवाई करतात म्हणून नियम पाळण्यापेक्षा कोणताही अपघात होऊ नये, याची खबरदारी प्रत्येक वाहनचालकाने घेण्याचे जरुरीचे आहे.

Advertisement
Tags :

.