उचगाव-कोनेवाडी संपर्क रस्त्यावरील धोकादायक पूल
संरक्षक कठडे नसल्याने वाहनधारकांना धोका : पुलाच्या दुतर्फा त्वरित कठडे बांधण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोनेवाडी या संपर्क रस्त्यावरती उचगाव हद्दीत नाल्यावरती असलेल्या पुलाला दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने सदर पूल धोकादायक असून या पुलावरून रोज कोनेवाडीमधील माध्यमिक विभागासाठी उचगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने ये-जा असते. सदर विद्यार्थी सायकलवरून प्रवास करत असतात. यामुळे हा पूल म्हणजे धोकादायक झाला आहे. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा कठडे बांधण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिक आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
उचगाव ते कोनेवाडी हा दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा संपर्क रस्ता आहे. कोनेवाडी गावाला जायचे असेल किंवा कोनेवाडी गावातून उचगाव भागात यायचे असेल तर बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरून व तुरमुरी गावाहून कोनेवाडी गावाला किंवा उचगाव परिसरात ये-जा करावी लागते. मात्र सदर मार्गावरून ये-जा करण्यासाठी पुन्हा दोन किलोमीटर अंतर अधिक ये-जा करावी लागते.
सदर पुलाच्या पश्चिमेला उंच भाग असून त्या भागातून येणारी वाहने, बैलगाड्या वेगाने खाली पुलाच्या दिशेने येतात. तसेच या पुलाच्या प्रारंभीच वळण असल्याने याचा अंदाज बैलगाडी तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांना येत नसल्याने अकस्मात या पुलातून नाल्यात पडून मोठी घटनाही या ठिकाणी घडू शकते. अशा घटना यापूर्वी घडलेल्याही आहेत. यासाठी तातडीने या पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधून शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा धोका टाळावा, अशी मागणी या भागातील असंख्य नागरिकांतून करण्यात येत आहे.
संरक्षक कठडे नसल्याने पूल बनलाय मृत्युचा सापळा
उचगाव-कोनेवाडी संपर्क रस्ता अडीच किलोमीटर अंतराचा असल्याने तसेच बेळगाव-वेंगुर्ले मार्ग हा अतिशय रहदारीचा असल्याने या संपर्क मार्गावरूनच अनेक नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असते. याबरोबरच उचगावातील अनेक शेतकऱ्यांची शेती उचगाव-कोनेवाडी रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली आहे. उचगावमधील शेतकऱ्यांचीही याच मार्गावरून नेहमी ये-जा सुरू असते. मात्र सदर पुलाच्या दुतर्फा कठडेच नसल्याने हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे.