For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिजकम बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने धोका

11:09 AM May 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
ब्रिजकम बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने धोका
Advertisement

पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष : मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ

Advertisement

खानापूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. खानापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली मलप्रभा नदी पहिल्यांदाच मे महिन्यातच वाहू लागली आहे. खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आलेल्या नसल्याने मलप्रभेला आलेल्या पाण्यामुळे फळ्या न काढल्याने पाण्याची फूग वाढून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून तसेच हवामान खात्याने धोक्याचा इशारा देवून देखील पाटबंधारे खात्याने ब्रिजकम बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याबाबत निर्णय न घेतल्याने धोका निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरुवात केल्याने तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात कणकुंबी, पारवाड, जांबोटी, आमगाव भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे मलप्रभा नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाली आहे. पाटबंधारे खात्याने देवाचीहट्टी, तोराळी, आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बंधाऱ्यातील फळ्यांच्या खाली अवघ्या तीन फुटापर्यंत पाणी पातळी वाढलेली आहे. जांबोटी भागातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्याने पाणी पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे खात्याने ब्रिजकम बंधाऱ्याच्या फळ्या काढणे गरजेचे होते. मात्र पाटबंधारे खात्याने  गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही.

Advertisement

बंधाऱ्यावरून पाणी वाहण्याची शक्यता

सोमवार सकाळपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यास बंधाऱ्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार असून पुराच्या धोक्याची शक्यता आहे. तसेच बंधाऱ्यालाही धोका निर्माण होणार आहे. पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने गेल्या दोन दिवसापूर्वीच बंधाऱ्याच्या फळ्या काढणे गरजेचे हेते. मात्र अक्षम्य दुर्लक्षामुळे बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याबाबत अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने धोका निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.