पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नृत्य
सध्या ‘पर्यावरणाचे संरक्षण’ हा सर्वाधिक चर्चेचा जागतिक विषय आहे. पर्यावरणाची हानी प्रमाणाबाहेर झाली, तर मानवाचे आणि जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, याची जाणीव आज बऱ्याच सर्वसामान्य नागरीकांनाही झाली आहे. अशा स्थितीत प्रत्येक संवेदनशील मनुष्य किंवा मनुष्यांचा समूह पर्यावरचाच्या संरक्षणासाठी त्यांना शक्य आहे तितके उपाय करत आहेत. काही जणांनी अत्यंत अनोखे उपायही शोधून काढले आहेत. आफ्रिका खंडातील झिम्बाब्वे या देशातील काही युवकांनी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी ‘नृत्य’ उपयोगी ठरते असे दिसून आल्यापासून ते अभियान हाती घेतले आहे. लिंकन नावाचा युवक याकामी पुढाकार घेत आहे, अशी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आता नुसते नाचून पर्यावरणाचे संरक्षण कसे होते, असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित होईल. तर, त्याचे उत्तर असे, की केवळ नाचगाणी केल्याने पर्यावरणावर काही परिणाम होत नाही. पण नृत्यांच्या आणि गायनाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा अधिक चांगल्या आणि प्रभावी रितीने करण्यात येते. त्यामुळे लिंकन हा युवक आणि त्याचे सहाध्यायी वेगवेगळ्या नृत्यस्पर्धांमध्ये भाग घेतात. या स्पर्धांमध्ये ते पर्यावरणासंबंधी लोकजागृती होईल, अशा प्रकारची नृत्ये आणि गाणी सादर करतात. त्यामुळे अशा स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या सहस्रावधी लोकांना पर्यावरणाचे महत्व आणि ते वाचविण्याची आवश्यकता या संबंधातील संदेश मिळतो. लोकांच्या मनात तो ठसतो. असे लोक नंतर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करु लागतात. विशेषत: प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून जी पर्यावरण हानी होते, तिच्या संदर्भात ही जनजागृती नृत्यगायनाच्या माध्यमातून केली जात आहे. हा प्रभावी आणि आकर्षक उपाय असल्याचा लिंकन यांचा अनुभव आहे. त्यांचा हा मार्ग अत्यंत लोकप्रिय होत आहे. त्यांची गाणीही आज या देशामध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. प्लॅस्टिकचा कचरा नैसर्गिकरित्या विघटीत होत नाही. त्यामुळे पृथ्वीवर तो लक्षावधी वर्षे आहे त्याच स्थिती साचून राहतो. त्यामुळे प्लॅस्टिकचे उत्पादन आणि उपयोग कमीत कमी करणे, हाच प्रभावी उपाय असल्याचा संदेश लिंकन हे देत आहेत.