For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दामू नाईक यांची अटल निष्ठा फळास आली!

12:27 PM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
दामू नाईक यांची अटल निष्ठा फळास आली
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित : येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

Advertisement

पणजी : गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा दोन वेळचे आमदार दामू नाईक यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. दि. 17 रोजी पक्षाची आमसभा होणार असून त्यावेळी दामू नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. खरे तर आजपर्यंतचा इतिहास पाहता भाजपच्या संघटनात्मक निवडणुका या सहजा होत नसतात. त्यांच्या नेत्यांची निवड ही बिनविरोध आणि एकमुखी निर्णयाने करण्यात येते. यंदा मात्र या पदासाठी तब्बल सहा नावे समोर आली होती. त्यामुळे बिनविरोधाची परंपरा खंडित होते की काय असा संशय निर्माण झाला होता. परंतु हाती आलेल्या वृत्तानुसार भाजप स्वपरंपरेवर ठाम राहणार असून दामू नाईक यांची निवड बिनविरोधच होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.

दोन वेळा फातोर्डाचे आमदार राहिलेले दामू नाईक हे सध्या पक्षाचे सरचिटणीस म्हणून पदभार सांभाळत आहेत. यापूर्वीही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बनण्याची संधी चालून आली होती. परंतु अंतर्गत राजकारण व पक्षांतर्गत एका गटाच्या विरोधामुळे त्या पदापासून ते दूर राहिले होते. मात्र त्यांच्या अटल पक्षनिष्ठेची दखल केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा घेतली व अखेरीस आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. दामू हे केवळ एक राजकारणी नसून राज्यातील सर्वात मोठा असलेल्या भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. तरीही त्यांनी स्वत:साठी कधी समाजाचे कार्ड वापरलेले नाही. स्वत:ची हिंमत आणि नेतृत्वगुणांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात पाय घट्ट रोवून आहेत.

Advertisement

गेल्या कित्येक वर्षापासून मडगावात शिमगोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नेतृत्व करत आहेत. त्याशिवाय ते साहित्यिक तसेच कवीही असून ‘दामबाबाले घोडे’ या स्वत:च्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. साईंबाबांवरील अपार श्रद्धेतून त्यांनी फातोर्डा येथे श्रीसाईमंदिराच्या उभारणीत महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या गुणांचीही दखल केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा घेतली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या विविध कारणांमुळे विखुरल्या, भरकटल्या गेलेल्या भंडारी समाजाला एकत्र आणण्याचे आव्हान दामू नाईकच पेलू शकतात व तसे झाल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. त्यांच्या या नेतृत्वामुळे भंडारी समाजालाही बळ मिळणार आहे. त्यामुळे अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाकडे पक्षनेतृत्व दिल्यास ती धुरा ते यशस्वीपणे सांभाळतील, याची खात्रीही केंद्रीय नेतृत्वाला पटली आहे. म्हणुनच या कार्याची पावती त्यांना देण्यावर केंद्रीय नेतृत्वाचे एकमत झाले आहे, अशी माहिती दिल्लीतील सुत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.