हत्तीच्या कळपाकडून भातशेतीचे नुकसान
वार्ताहर/रामनगर
सध्या शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम सुरू होत असून, सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच आता हत्तीचा कळप शेतात घुसून पूर्ण शेतीची नासधूस करत असल्याने शेतकरी वर्गाला मोठी चिंता लागली आहे. शुक्रवारी मध्यरात्री खानापूर तालुक्यातील मांजर पै भागातून रामनगर भागात हत्तीचा कळप घुसून रामनगर सीतावाडा टोलनाक्यानजीकच्या गणपती देसाई यांच्या शेतात घुसून दोन एकरमधील भाताचे मोठे नुकसान केले आहे. सात ते आठ हत्तींचा कळप असल्याचा अंदाज त्यांच्या पावलांच्या ठसावरून व्यक्त करण्यात आला आहे. सदर कळप शनिवारी मध्यरात्री पुन्हा रामनगर येथील गणेश गल्लीत भर वस्तीत दाखल झाला. गणेश गल्लीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या शेतवडीतही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे रविवारी पहाटे पहावयास मिळाले. त्यामुळे येथील शेतकरी आता भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. रात्रीच्यावेळी आड वाटेने जाण्यास नागरिक घाबरत आहेत.