‘हाताला आले पण तोंडाला नाही’ पावसामुळे भातपिकाची अवस्था
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्यात भात हे महत्त्वाचे पीक असून यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे भातपीक जोमाने आले आहे. सध्या माळरानावरील भातपीक कापणीसाठी आले आहे. परंतु गेला आठवडाभर पडणाऱ्या दमदार पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. वारा पावसामुळे उभे असलेले भातपीक आडवे झाले असून भाताची लोंबे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. खानापूर तालुक्यात दरवर्षी 35 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. यावर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे भातलागवडीचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भात जोमाने आले होते. उत्पादनात वाढ होणार, शेतकरी सुखी होणार असे सर्वांनाच वाटत होते. नवरात्रीनंतर कमी पाण्याच्या जमिनीतील भात पिकाची कापणी करण्यात येते. परंतु गेल्या आठवड्याभरापासून भात कापणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. रोज पहाटेपासून सायंकाळपर्यंत आकाशात ढग दाटून येत आहे. केव्हा पाऊस पडेल याची शाश्वती नसते. एकदा पडलेला पाऊस मोठ्या प्रमाणात एकाच जागी पडत असल्याने जनतेत चिंता निर्माण झाली आहे.