मार्कंडेय नदीकाठच्या भात-ऊस पिकाचे नुकसान
भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला यावर्षी दोनवेळा पूर आल्याने मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या पिकांचे तर नुकसान झालेच. पण याबरोबरच यावर्षी ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. यावर्षी सप्टेंबर मध्य गाठला तरी अद्याप पावसाने पूर्ण विश्रांती घेतलेली नाही. पावसाचे प्रमाण यावर्षी अधिक झाल्याने नदीकाठच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील भात आणि ऊस या दोन्ही पिकांना चांगलाच फटका बसला आहे. भाताच्या पिकांची तर दोन वेळा रोप लागवड करण्यात आली. रोप लागवड करताना रोपांची टंचाई भासली आणि आता काठावर असलेल्या ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
ज्या ऊस पिकाची उंची कमी होती त्या उसाच्या सरीमधून गढूळ पाणी जाऊन ऊस पाण्याखालीच राहिल्याने उसाचे पीक कुजून मोठे नुकसान झाले आहे. भात पिकाचेही मोठे नुकसान झाले. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या या शेतीतील नुकसान झालेल्या पिकांचा मोठा फटका शेतकऱ्यांना यावर्षी सहन करावा लागत आहे. भाताच्या रोपांची टंचाई भासल्याने शेती अनेक ठिकाणी पड पडल्याचेही चित्र सध्या दिसून येत आहे.यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी तमाम शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.