रंकाळा विद्युत खांबाचे नुकसान ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूर :
कोल्हापूर शहर सुधारणा समितीने दोन दिवसांपूर्वी रंकाळा तलावावर विद्युत खांब व दिव्याचे अज्ञात व्यक्ती अथवा वाहनाकडून जे नुकसान झाले होते. त्याविरोधात आवाज उठवून प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन अखेर महापालिकेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित अरूण दळवी यांनी याची फिर्यादा दिली.
महायुती सरकारच्या निधीतून रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषाणाई केली आहे. यामुळे रंकाळा तलावावर रात्रीच्यावेळी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची गर्दी वाढत आहे. विद्युतरोषणाईबाबत सर्व स्तरातून महापालिकेचे कौतुक होत आहे. परंतू काही विघ्नसंतोषी लोकांमुळे विद्युतरोषाणाईच्या कामाचे नुकसान होत आहे. चार दिवसांपूर्वीच रंकाळा तलाव येथे विद्युत खांबाचे अज्ञात वाहनाने धडक देऊन नुकसान केले. यासंदर्भात शिवसेनेच्या किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर शहर सुधारणा समितीने महापालिकेकडे कारवाईची मागणी केली होती. यानुसार मनपाने सोमवारी अज्ञाताविरोधात अंदाजे 40 हजारांचे नुकसान केल्याचे अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
- सीसीटीव्ही तपासून कारवाई करा
जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार आमते यासंदर्भात तपास करीत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने परिसरातील सी. सी. टीव्हीचे फुटेज तपासून संबधितांवर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीने केली आहे.