कंग्राळी बुद्रुक बसस्टँडमधील खुर्च्यांची मोडतोड
समाजकंटकांचा त्वरित शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावाला लागून असलेल्या तलावाजवळ हिंडाल्को कंपनीकडून गावच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या हुतात्मा जवान निंगाप्पा चिखलकर यांच्या स्मारकाशेजारी हायमास्ट बसस्टँड व मार्निंग वॉकर्स व इतरांना बसण्यासाठी बसविलेल्या काँक्रीट खुर्चीची समाजकंटकांकडून तोडफोड झाल्यामुळे अशा समाजकंटकांचा त्वरित शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हिंडाल्को कंपनीकडून प्रवासीवर्गासाठी हायमास्ट बसथांबा
कंग्राळी बुद्रुक गावाला राज्य परिवहन मंडळकडून केएलई हॉस्पिटलमार्गे व शाहूनगरमार्गे दोन्हीकडून बसेस सोडून कंग्राळी बुद्रुक गावासह इतर प्रवासी वर्गाची चांगली सोय केली आहे. गावच्या तलावाजवळ गावच्या प्रवेशद्वारावरच हिंडाल्को कंपनीने हायमास्ट बसथांबा उभारून बाजूला काँक्रीट खुर्च्या बसवून प्रवासीवर्गाबरोबर इतर नागरिकांसाठी बसण्याची उत्तम सोय केली आहे. परंतु सदर बसथांब्यामध्ये गावठी दारुची पाकिटे आणून दारू पिणे व नशा झाल्यानंतर खुर्ची मोडणे असे प्रकार घडत आहेत. ग्रा. पं. ने याकडे लक्ष देऊन अशा समाजकंटकांना वेळीच पकडून योग्य शासन करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.
हुतात्मा जवान निंगाप्पा चिखलकरचे स्मारक गावच्या वैभवात भर घालणारे
हायमास्ट बसस्थानकाला लागूनच ग्रा. पं. माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्या सहकार्याने कंग्राळी गावचे सुपुत्र तसेच 1987 साली भारतीय सैन्यातून श्रीलंकेमध्ये शांतीसेनेतून सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या हुतात्म्याचे स्मारक याठिकाणी उभारण्यात आल्यामुळे गावामध्ये प्रवेश करताना या जवानाला सलाम करून प्रत्येक नागरिक गावामध्ये येत असतो. परंतु या समजकंटकांना याचे सोयरसुतक नसते. सामाजिक भान ठेवून अशा ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केलेली आहे. याचेसुद्धा त्यांना भान नसते. अशा समाजकंटकांचा वेळीच शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.