कंग्राळी बुद्रुक येथील संरक्षक भिंत कोसळून नुकसान
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने कलमेश्वर गल्लीतील शशिकांत गणपत चव्हाण यांच्या राहत्या घराची संरक्षक भिंत कोसळून एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. मरगाईनगर परिसराकडील पावसाचे पाणी येण्यासाठी ग्राम पंचायतीने कायमस्वरूपी गटारीची बांधणी न केल्यामुळेच पावसाचे पाणी चव्हाण यांच्या घरात शिरले. याला ग्रा. पं. अध्यक्ष व उपाध्यक्ष जबाबदार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे, भारता पाटील पाहणी दरम्यान ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केल्या.
काल सायंकाळी 5 वा. कंग्राळी बुद्रुक परिसरात परतीच्या मुसळधार पावसाने धूमाकूळ घातला. या पावसाच्या पाण्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. मरगाईनगर परिसरातील पाणी गटारीद्वारे येण्यासाठी ग्रा. पं. कडून कायमस्वरूपी गटारीची बांधणी करण्यात आली नाही. यामुळेच पाण्याचा लोंढा कलमेश्वर मंदिरसमोरील गल्लीमध्ये बांधण्यात आलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घराभोवती साचले आणि त्यांच्या घराभोवती बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली. जर गटारींचे नियोजन राहिले असते तर या गरीब कुटुंबावर ही नुकसानीची वेळ आली नसती, अशाही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
विकासाकडे अध्यक्ष-उपाध्यक्षांचे दुर्लक्ष
ही ग्रा. पं. तालुक्यातील ए ग्रेड पंचायत म्हणून पाहिले जाते. विस्तार मोठा असल्यामुळे 13 वॉर्ड आहेत तर सदस्य संख्या 34 आहे. निधीसुद्धा भरपूर येतो. ग्रा. पं.च्या मासिक मिटींगमध्ये निधी कुठे वापरून विकास करावा, हे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हातात असते. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष मासीक मिटिंगला अनुपस्थित राहत असल्यामुळे विकास कामांचा आराखडा कोण करणार? यामुळेच गावचा विकास खुंटला असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक व सदस्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, अनिल पावशे, दादासाहेब भदरगडे, भारता पाटील यांनी पाहणी करून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मंजूर करून नुकसानग्रस्त कुटुंबाला दिलासा देण्याचे विचार व्यक्त केले.