वडगाव येथे घराची भिंत कोसळून नुकसान
बेळगाव : संततधार पावसामुळे वडगाव रयत गल्ली कॉर्नर येथील एका घराची भिंत कोसळली आहे. रविवार दि. 27 रोजी दुपारी ही घटना घडली आहे. मधू निंगाप्पा लोहार असे संबंधित घरमालकाचे नाव आहे. घराची भिंत कोसळल्याने संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. केवळ सुदैवानेच यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुटुंब उघड्यावर पडले असल्याने जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर परिसरासह ग्रामीण भागात घरांची पडझड होत आहे. त्यामुळे अनेक जणांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीची भिंत भिजल्याने मधू लोहार यांच्या घराची भिंत रविवारी दुपारी कोसळली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.