खानापूर तालुक्यातील दलित संघटनांतर्फे अमित शहांच्या विरोधात निदर्शने
खानापूर : देशाची गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव घेण्यावरुन वाद्ग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशात उमटत आहेत. तालुक्यातील विविध दलित संघटनांच्यावतीने अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून राजा छत्रपती चौकात पुतळ्याचे दहन करून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देवून अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दलित संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.तालुक्यातील विविध दलित संघटनांच्यावतीने अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमित शहा यांच्या प्रतिकृतीची प्रेतयात्रा काढून अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राजा छत्रपती चौकात निषेध मोर्चा आल्यानंतर काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर अमित शहा यांच्या प्रत़िप़ृतीचे दहन करण्यात आले. यानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी शिवाजी मादार, लक्ष्मण मादार, राजशेखर हिंडलगी, मल्लेशी पोळ, सुरेश शिंगे, राम मादार, मनोहर मादार, राजेंद्र चलवादी, संतोष चित्तळे यासह इतर दलित नेत्यांची अमित शहा यांच्या वक्तव्याची निषेध करणारी भाषणे झाली. या मोर्चात विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हेते.