चिकोडी जिल्हा मागणीसाठी दलित संघटनेचे आंदोलन
जिल्हा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन : प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
चिकोडी : चिकोडी जिल्हा लवकर घोषित करा, या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले. मंगळवारी दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. प्रांताधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रमिला देशपांडे यांनी हे निवेदन स्वीकारले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध संघटनांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन लवकर जिल्हा घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही विविध संघटनांकडून निवेदन देण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. रोज एका संघटनेच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याचे आंदोलन जिल्हा संघर्ष समितीने ठरविले आहे. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दलित संघटनेच्यावतीने आंदोलन केले. यावेळी संघर्ष समितीचे प्रा. एस. वाय. हंजी, सुरेश ब्याकुडे, रूद्राप्पा संगाप्पगोळ, राजू घस्ते, सुदर्शन तम्मनावर, अर्जुन माने, बाबुराव घट्टी, रमेश बस्तवाडे आदी उपस्थित होते.