डलिबोर स्वर्सिना विजेता
वृत्तसंस्था / पुणे
येथे झालेल्या एटीपी टूरवरील 100 दर्जाच्या पुरुषांच्या महाराष्ट्र खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेक प्रजाकसत्ताकच्या डलिबोर स्वर्सिनाने एकेरीचे अजिंक्यपद मिळविले.
या स्पर्धेत डलिबोर स्वर्सिनाने 22 वर्षीय हॉल्टचा 7-6 (7-3), 6-1 असा पराभव केला. 22 वर्षीय डलिबोर स्वर्सिनाने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. हा अंतिम सामना दीड तास चालला होता. या अंतिम लढतीत हॉल्टने पहिल्या सेटमध्ये डलिबोर स्वर्सिनाला चांगलेच झुंजवित टायब्रेकरपर्यंत हा सेट लांबविला. पण डलिबोर स्वर्सिनाने हा पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये हॉल्टला केवळ एक गेम जिंकण्याची संधी दिली. या स्पर्धेतील जेतेपदाबरोबरच डलिबोर स्वर्सिनाला 100 एटीपी मानांकन गुण आणि 22730 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस तर उपविजेत्या हॉल्टला 7 एटीपी गुण आणि 13350 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले.