दलाई लामा द्विपक्षीय संबंधांमधील मुख्य अडथळा!
चिनी राजदूताची कठोर टिप्पणी : दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी अलिकडेच स्वत:चा 90 वा जन्मदिन साजरा केला आहे. यानिमित्त हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील त्सुगलाखांग मंदिर परिसरात आयोजित सोहळ्यात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राजीव रंजन सिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सिक्कीमचे मंत्री सोनम लामा सामील झाले हेते. दलाई लामांच्या जन्मदिनानिमित्त भारत सरकारचे प्रतिनिधी तेथे उपस्थित राहिल्याने चीन भडकला आहे. दिल्लीतील चिनी दूतावासाने रविवारी चीन आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याचा मुद्दाच सर्वात मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य केले आहे. 2020 साली सीमेवर झालेल्या झटापटीनंतर भारताचे विदेश मंत्री पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाण्याची तयारी करत असताना हे वक्तव्य समोर आले आहे.
माझा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत चीनची कुठलीच भूमिका नसेल असे दलाई लामा यांनी जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले होते. तर दलाई लामांचा पुढील उत्तराधिकारी आमच्या मंजुरीनुसारच ठरणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
दलाई लामा हे 1959 मध्ये चीनने तिबेट गिळंकृत केल्यावर भारतात पोहोचले होते. तेव्हापासून ते भारतात राहून चीन सरकारच्या विरोधात आवाज उठवून तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. भारतात सुमारे 70 हजार तिबेटी शरणार्थी आहेत. भारतात एक निर्वासित तिबेटी सरकार देखील आहे.
काही रणनीतिक आणि शैक्षणिक लोकांनी दलाई लामांच्या पुनर्जन्मावरून चुकीची वक्तव्यं केली आहेत. या लोकांनी भारत सरकारच्या भूमिकेच्या विरोधात वक्तव्यं केली आहेत असा दावा चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी एक्सवर पोस्ट करत केला आहे.
विदेशी प्रकरणांशी निगडित लोकांना तिबेटशी (ज्याला चीन शिजांग संबोधितो) संबंधित मुद्द्यांची संवेदनशीलता समजून घ्यावी. दलाई लामांचा पुनर्जन्म आणि उत्तराधिकार पूर्णपणे चीनचा अंतर्गत विष्घ्य आहे. तिबेटशी निगडित हा मुद्दा भारत-चीन संबंधांमधील एक अडथळा असून भारतासाठी हा भार ठरला आहे. जर भारत ‘तिबेट कार्ड’ वापरत असेल तर स्वत:चेच नुकसान करून घेईल असे यू जिंग यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी
चीनच्या या संतप्त प्रतिक्रियेमागे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. एक बौद्ध अनुयायाच्या स्वरुपात दलाई लामा आणि त्यांचे कार्यालयच उत्तराधिकाऱ्यासंबंधी निर्णय घेऊ शकते असे माझे मानणे असल्याचे रिजिजू यांनी म्हटले हेते. यावर चीनने कठोर आक्षेप घेत याला ‘चीनविरोधी फुटिरवादी भूमिका’ संबोधिले.