For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दलाई लामा फुटिरवादी

06:12 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दलाई लामा फुटिरवादी
Advertisement

वृत्तसंस्था/ धर्मशाळा, बीजिंग

Advertisement

अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी मंगळवारी धर्मशाळा येथे पोहोचत तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची भेट घेतली आहे. या भेटीवर अमेरिकेसह भारत सरकारची नजर होती. तर याचदरम्यान पेलोसी आणि दलाई लामा यांच्या भेटीमुळे चीन संतापला आहे. अमेरिकन खासदार आणि 14 व्या दलाई लामा यांच्या भेटीवरून आम्ही चिंतेत आहोत. अमेरिकेने दलाई लामा यांच्या चीनविरोधी वर्तनाला समजून घेत तिबेटसंबंधीच्या स्वत:च्या प्रतिबद्धतांचे पालन करावे असे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेने दलाई लामांसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवणे टाळावे आणि उर्वरित जगाला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करू नये असे चीनने म्हटले आहे. नॅन्सी पेलोसी यांच्यासमवेत 6 सदस्यीय अमेरिकन शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने दलाई लामा यांची मंगळवारी भेट घेतली आहे.

Advertisement

धर्मशाळा येथे आल्यावर मला अत्यंत रोमांचक वाटत असल्याचे पेलोसी यांनी नमूद केले आहे. पेलोसी यांनी संसदेच्या सभापती म्हणून कार्यरत असताना तैवानचा दौरा केला होता. पेलोसी यांच्या या कृत्यामुळे चीनने संतप्त होत तैवानला चारही बाजूने घेरले होते.

अमेरिकेकडून दलाई लामांचे कौतुक

नॅन्सी पेलोसी यांच्यासोबत विदेश विषयक समितीचे अध्यक्ष मायकल मॅककॉल, संसदेच्या विदेश विषयक समितीचे वरिष्ठ सदस्य ग्रेगोरी डब्ल्यू मीक्स यांनीही दलाई लामांची भेट घेतली आहे. दलाई लामा हे लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेलोसी यांनी भारतात येत त्यांची भेट घेतली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना दलाई लामा यांची बिडेन प्रशासनासोबत चर्चा होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

भारतासोबत चर्चा

अमेरिकेचे हे शिष्टमंडळ भारतातील नेते तसेच अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आणि अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदार आहे. भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे खासदार मॅककॉल यांनी म्हटले आहे. दलाई लामांची भेट घेण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला सन्मानित मानत आहे. तिबेटचे लोक हे लोकशाहीप्रेमी असून ते स्वत:च्या धर्माचे स्वतंत्र स्वरुपात पालन करू इच्छितात. या दोरयामुळे अमेरिकेच्या संसदेत तिबेटच्या भविष्याविषयी स्वत:चे मत मांडण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.