येळ्ळूरच्या दहीकाल्याला शेकडो वर्षांची परंपरा
दहीकाला पाहण्यास आबालवृद्धांची अमाप गर्दी
वार्ताहर/येळ्ळूर
शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला येळ्ळूर येथील दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावकऱ्यांनी हा उत्सव बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. गावाला अध्यात्माबरोबर मोठी वारकरी परंपराही लाभली आहे. आषाढ वारीची सांगता करण्यासाठी गावातील वारकरी संप्रदाय परंपरागत पद्धतीने प्रतीवर्षी उत्सव साजरा करीत असतो. पंढरीतील दहीकाला झाल्याशिवाय गावात दहीकाला उत्सव साजरा केला जात नाही. कारण बरीच वारकरी मंडळी पंढरीतील दहिकाला झाल्याशिवाय पंढरी सोडत नाहीत. या दिवशी गावात वार पाळून सर्व लहानथोर मंडळी या उत्सवाला हजेरी लावतात. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शेकडो वर्षे चालत आलेला आहे.
टाळमृदंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर वारकरी मंडळी व भजनी मंडळ दहीकाल्याने भरलेले मडके वाजतगाजत मिरवणुकीने ग्रामदैवत चांगळेश्वरी देवीच्या प्रांगणात आणतात. देवीच्या देवळात भजनाचा कार्यक्रम झाल्यावर दहीकाल्याचे मडके गोल फिरणाऱ्या खांबावर बांधले जाते. यासाठी गावातील खाशी मंडळी असतात. दहीकाल्याचे मडके फोडण्यासाठी तरुण मंडळी लाठ्या घेवून उतरताच खाशी मंडळी मडके गोल, अर्धगोल फिरवत वरखाली करून तरुणांना झोकांडी देत मडके फोडणाऱ्या तरुणांच्या नाकीनऊ आणतात. हा कार्यक्रम बराच वेळ रंगतो. अखेर लाठीच्या तडाख्याने मडके फुटताच एक झुंबड उडते ती मडक्याचा तुकडा मिळवण्यासाठी. हा तुकडा घरात ठेवल्यास घरात दुधदुभत्याची भरभराट होते, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. दहीकाला झाल्यावर सर्वांना चिरमुरे, बत्ताशाचा प्रसाद देऊन उत्सवाची सांगता होते. या दिवशी वारकरी मंडळी एकत्रित येऊन ममद्याचा कार्यक्रम करतात.