शिरगाव कुस्ती मैदानाचे दादा शेळके मानकरी
उलटी पुट्टी डावावर इराणचा मल्ल इरफान हुसेन याला केले चितपट : अयोध्येचा बाबा लाडी मल्लामुळे शिरगाव मैदान गाजले : दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत
वार्ताहर/बेडकिहाळ
शिरगाव-शिरगाववाडी व गिरगाव येथील ग्राम दैवत श्री बसवेश्वर यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन 20 रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले होते. या मैदानातील साडेतीन लाखाची रॉयल एनफिल्ड बुलेट बक्षिसाची पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी मल्ल दादा शेळके व इराणचा मल्ल इरफान हुसेन यांच्यात लावली होती. या मध्ये मल्ल दादा शेळके याने मल्ल इरफान हुसेन याला उलटी पुट्टी डावावर अवघ्या 5 मिनिट 18 सेकंदात चितपट करून विजय खेचून आणला. पंच म्हणून अशोक पाटील, अनिल पाटील यांनी काम पाहिले. सदर कुस्ती श्रीमंत गौरवसिह नरसिहराव मुतालिक देसाई-शिरगावकर, सरकार व पहिल्या क्रमांकाचे बक्षीस वितरक श्री बसवेश्वर यात्रा कमिटीकडून होते
मैदान पूजन यात्रा व कुस्ती कमिटी कडून करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हलगीच्या निनादात कुस्ती मैदानाला सुरवात झाली. यावेळी माजी खासदार उमेश कत्ती, शरदचंद्र कवटगीमठ, अद्विक हुक्केरी, श्रीमंत सरकार गौरवसिह नरसिहराव मुतालिक देसाई, सीपीआय कऱ्याप्पा बन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंजाबचा मल्ल विक्रांतकुमार पंजाब विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी मल्ल प्रकाश बनकर यांच्यात झाली. हा सामना बरोबरीत झाला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात महान भारत केसरी मल्ल माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणा चा मल्ल रोहित गुलिया यांच्यात झाला. त्यात गुलिया याने विजय मिळविला.
चौथ्या क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र मल्ल विक्रम घोरपडे व हरियाणाचा चॅम्पियन मल्ल पवनकुमार हरियाणा यांच्यात झाली. त्यात पवनकुमारने यश मिळाविले. पाचव्या क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शंभू कोळेकर विरुद्ध दसरा कंठीरवचा मल्ल शिवाय पुजारी यांच्यात झाली. त्या पुजारी याने यश मिळविले. सहाव्या क्रमांकाच्या सामन्यात पुण्याचा मल्ल सुबत पाटील विरुद्ध दिल्लीचा मल्ल आशिष कुमार झाला. त्यात आशिषकुमारने यश मिळविले. सातव्या क्रमांकाच्या सुरेश विरुद्ध संगमेश यात सुरेशना यश मिळविले. आठव्या क्रमांकाचा सामना दयानंद शिरगाव विरुद्ध सुमित कुमार यांच्यात झाला. त्यात दयानंद यांने यश मिळविले. नव्या क्रमांकाच्या सामन्यात शिरगावचा मल्ल सचिन शिरगावी हा विजय झाला.
विजेत्यांना अनुक्रमे 3 लाख 51 हजारची बुलेट, 2 लाख 1 रुपये, 1 लाख 50 हजार, 1 लाख 51 हजार, 1 लाख 1 रुपये, 51 हजार 1 रुपये, 51 हजार 1 रुपये, 51 हजार 1 रुपये, व 25 हजार रुपयांची बक्षीस चांदीची गदा ढाल बक्षिस देण्यात आले. याशिवाय शिवानंद निर्वाणट्टी, प्रदीप ठाकूर उत्तर प्रदेश, महेश अथणी, पांडुरंग माने, शाहरुख वासिम, प्रकाश इंगळी, रामचंद्र धुमकनाळ, ज्ञानेशू देहली, मुबारक इंगळी, विश्वजीत रुपनार, विशाल कुडाळकर, यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्लांचा जाहिरात ब्लॉकवरील कुस्त्या भर पावसात पार पडल्या.
मैदानात मनोरंजनासाठी म्हणून अयोध्येचा सुप्रसिद्ध मल्ल बाबा लाडी व आणि हिमाचल प्रदेशचा मल्ल सुमित यांच्यात मनोरंजनाची कुस्ती लावण्यात आली होती. जय श्रीरामचा नारा देत अयोध्येचा मल्ल बाबा लाडी याने मल्ल सुमित याला संपूर्ण मैदान पळवून हाणले. यावेळी शौकीनांनी जल्लोष केला. बाबा लाडीने मैदान गाजविल्याने त्याला कुस्ती प्रेमींनी पोत्यातून हजारो रुपयांची बक्षिस म्हणून रक्कम गोळा करून दिली. कुस्ती निवेदक म्हणून मराठीमध्ये मायकल, कन्नडमध्ये क्रीडा शिक्षक पी. एन. अलगुर आणि हिंदीमध्ये भीमा उदगट्टी यांनी काम पाहिले.
मैदानात कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, दिल्ली, नेपाळ, इराण, येथील अनेक नामवंत मल्लांचा निकाली जंगी कुस्त्या झाल्या. संयोजक महादेव उदगट्टी, यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुस्त्या पार पडल्या. तर कुस्ती यशस्वी करण्यासाठी बसू मगदूम, शंकर मलकापुरे, संजय पुजारी, निशिकांत फराळे, महादेव उदगट्टी, उदयन नेस्ती, राजू मस्ते, बाळू तोडकर, महेश पराळे, यांच्यासह श्री बसवेश्वर यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, यात्रा, कुस्ती कमिटीचे सर्व सदस्य, विविध संघ संस्थेचे पदाधिकारी, कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो कुस्ती प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.