दादला पाच बायकांचा...
एका सुखी संसारात एक पत्नी आणि एक पती तसेच त्यांची अपत्ये आणि कुटुंबातील त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यक्ती अशी सर्वसाधारण स्थिती असते हे सर्वांना ज्ञात आहे. एकापेक्षा अधिक पत्नी एकावेळी असू शकत नाहीत, असे निर्बंधही घातले गेलेले असतात. एक पत्नीला समाधानी ठेवणेही कित्येकदा अनेक पुरुषांना कठीण होत असते. पण तरीही बहुतेक माणसे लग्न करतातच. ‘शादीके ल•t, खाये तो भी पछताये, न खाये तो भी पछताये, असे म्हटले जाते ते यासाठीच. लग्न करावे तरी अडचण, नाही करावे तरी अडचण, असे असते.
तथापि, ब्राझीलमध्ये एक महापुरुष असा आहे की तो एकाच वेळी पाच लग्नाच्या बायकांसह सुखाने संसार करीत आहे. इतकेच नव्हे, तर त्याचे एकंदर 9 विवाह झाले आहेत. काही वर्षांपूर्वी तो या नऊही पत्नींसह संसार करीत होता. पण त्याच्या चार पत्नींनी त्याला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे सध्या त्याच्यापाशी 5 पत्नी शिल्लक उरल्या आहेत. ऑर्थर जो उर्सो असे या पराक्रमी पुरुषाचे नाव आहे. तो तीन वर्षांपूर्वी, अर्थात, 2021 मध्ये एकदम प्रकाशात आला. ज्याच्या त्याच्या तोंडी त्याचे नाव येऊ लागले. कारण त्याने एकाच वेळी 9 तरुणींशी विवाह करण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी त्याला अनेकांनी सोशल मिडियावर ट्रोलही केले होते. ब्राझीलच्या साओ पावलो या शहरात त्याचे वास्तव्य आहे.
सध्या त्याचे वय 37 वर्षांचे आहे. तो धनिक आहे. त्यामुळेच त्याच्याशी विवाह करण्यास 9 युवती तयार झाल्या असाव्यात. सध्या त्याच्या पत्नींची संख्या 5 आहे. अर्थात, या सर्व पत्नींना समाधानी ठेवण्यासाठी त्याला काय काय करावे लागत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. या पत्नींच्या वाढदिवसाचे दिनांक लक्षात ठेवण्यापासून ते त्यांना महागड्या भेटवस्तू वेळोवेळी देण्यापर्यंत, तसेच त्यांच्या नित्य आणि नैमित्तिक मागण्या पूर्ण करेपर्यंत त्याच्या नाकी नऊ येतात असे त्यानेच स्पष्ट केले आहे. पण एकंदर स्वारी खूष आहे असे दिसते.