डाबरचा दक्षिण भारतात होणार निर्मिती कारखाना
उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे निर्णय : देशात 13 कारखाने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी डाबर दक्षिण भारतामध्ये आपला कारखाना सुरू करण्याचा विचार करते आहे. डाबरच्या विविध उत्पादनांना ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन यासंबंधीचा निर्णय नुकताच घेतला असल्याचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितले आहे.
डाबर उत्पादनांच्या एकूण विक्रीमध्ये दक्षिण भारतातून ग्राहकांची मागणी ही 20 टक्के इतकी लक्षणीय असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ही वाढीव मागणी लक्षात घेऊनच आगामी काळामध्ये दक्षिण भारतामध्ये कंपनी उत्पादन निर्मिती कारखाना सुरू करणार आहे.
किती कारखाने
देशभरामध्ये एकंदर कंपनीचे 13 उत्पादन कारखाने आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये दक्षिण भारतामध्ये डाबरच्या उत्पादनांना 10 टक्केपर्यंतच मागणी ग्राहकांकडून नोंदवली जात होती. परंतु आता हीच मागणी दक्षिण भारतातून 19 ते 20 टक्के इतकी झाली असून या दुप्पट मागणीची दखल घेऊन ग्राहकांना उत्पादनांचा पुरवठा नियमितपणे करता यावा यासाठी नवा कारखाना अस्तित्वात येणार आहे. दक्षिण भारतात नवा कारखाना सुरु करण्याच्या कार्यात सध्या कंपनी गुंतली आहे. याआधी डाबरने इंदोरमध्ये 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना सुरू केला आहे.