डि मार्टचा नफा 17 टक्क्यांनी मजबूत
एप्रिल ते जूनमधील आकडेवारी सादर : महसूल 18 टक्क्यांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
एव्हेन्यू सुपरमार्ट्सची रिटेल चेन डीमार्टचा आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 773.82 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. वार्षिक आधारावर पाहायला गेल्यास नफ्यात 17.5 टक्के वाढ झाली आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 658.75 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 14,069.14 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला आहे. वार्षिक आधारावर 18.6 टक्केची वाढ झाली आहे. वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल-जून 2023 मध्ये कंपनीने 11,865.40 कोटी रुपयांची कमाई केली होती.
तिमाही नफा 37 टक्केने वाढला
कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीत (आर्थिक वर्ष 24) 563.25 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. जानेवारी-मार्चच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 37.38 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीच्या महसुलात 10.55 टक्के वाढ झाली आहे.
समभागाचा वर्षात 29 टक्के परतावा
एव्हेन्यू सुपरमार्टच्या समभागाने गेल्या 5 दिवसांत 1.47 टक्के, एका महिन्यात 6.30 टक्के, 6 महिन्यात 28.30टक्के आणि एका वर्षात 29.53 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी 1 जानेवारीपासून कंपनीने 21.78टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 3.22 लाख कोटी रुपये आहे.