डी. के. समर्थक आमदारांची दिल्लीवारी सुरुच
मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावर दोन-तीन दिवसात चित्र स्पष्ट : राहुल गांधींशी चर्चेनंतर होणार निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकारमधील अधिकार हस्तांतरावरून निर्माण झालेल्या गोंधळावर या आठवड्यातच तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला बोलावून घेऊन स्पष्ट निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, सोमवारी शिवकुमार यांच्या आणखी काही समर्थक आमदारांनी दिल्लीला धाव घेतली आहे. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, यासाठी हे आमदार हायकमांडवर दबाव आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या गटाची भूमिका काय असेल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
मागील पाच दिवसांपूर्वी सात ते आठ आमदारांनी दिल्लीला जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली होती. नंतर आमदार एच. डी. रंगनाथ, शरत बच्चेगौडा, आकेनल शिवण्णा, एस. आर. श्रीनिवास, नेलमंगलचे आमदार श्रीनिवास, राजेगौडा हे खर्गेंपाठोपाठ बेंगळूरला परतले होते. सोमवारी पुन्हा सहा-सात आमदार दिल्लीला गेले आहेत. यात आमदारांमध्ये चेन्नगिरीचे आमदार बसवराज शिवगंगा, मागडीचे आमदार बालकृष्ण, रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन, मद्दूरचे आमदार उदय कडलूर, होसकोटेचे आमदार शरत बच्चेगौडा, मुडीगेरेच्या आमदार नयना मोटम्मा, हानगलचे आमदार श्रीनिवास माने मंगळवारी सकाळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी या आमदारांनी वरिष्ठांवर दबाव आणला आहे.
शिवकुमार यांच्या समर्थनार्थ आमदारांच्या आणखी एका गटाने दिल्लीवारी केल्यामुळे कुतूहलात भर पडली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अधिकार हस्तांतरावर चर्चा होणार आहे.
आज खर्गे दिल्लीला
मागील तीन दिवसांपूर्वी बेंगळूरला आलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या, शिवकुमार व काही मंत्र्यांशी चर्चा केली होती. ते मंगळवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. राहुल गांधी यांची भेट घेऊन कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देतील. उभय नेते सिद्धरामय्या व शिवकुमार या दोन्ही गटांना मान्य होईल, असे असा उपाय सूत्र तयार करतील. तत्पूर्वी उभय नेत्यांना दिल्लीला बोलावून चर्चा करण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून समजते.
राहुल गांधी विदेश दौरा आटोपून 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीला परत येणार होते. मात्र, कर्नाटकातील घडामोडींमुळे ते नियोजित वेळेआधीच दिल्लीला परतले आहेत. दिल्लीला आल्यानंतर खर्गे राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदारांची मते काय आहेत, हे सांगतील. नंतर सरकार व पक्षाचे हित विचारात घेऊन योग्य निर्णय घेतील.
हायकमांडने सूचना दिली तरच पदावर : सिद्धरामय्या
पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असा सातत्याने पुनरुच्चार करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. हायकमांडने सूचना दिली तरच यापुढेही मुख्यमंत्रिपदावर राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. चिक्कबळ्ळापूर येथे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, हायकमांड जे सांगेल ते आम्ही ऐकले पाहिजे. त्यांच्या निर्णयाशी मी आणि डी. के. शिवकुमार कटिबद्ध असले पाहिजे. वरिष्ठांनी सांगितले तरच यापुढेही मी मुख्यमंत्रिपदावर राहीन. चार-पाच महिन्यार्पर्वी मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा हायकमांडने संमती दिली होती. आता सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याने मंत्रिमंडळ पुनर्रचना करणार असल्याचे वरिष्ठांना सांगितले होते. आता त्यांनी सूचना दिली तर मंत्रिमंडळात फेरबदल दिसून येतील. नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरही हायकमांड सांगेल तसे वागेन, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले.
सिद्धरामय्या जे सांगतीत ते वेदवाक्य : शिवकुमार
सिद्धरामय्या जे काही सांगतील ते आमच्यासाठी ‘वेदवाक्य’ आहे. त्यांच्या शब्दांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. हायकमांडवर आमचा विश्वास आहे. अधिकार वाटपाबाबत मी किंवा मुख्यमंत्र्यांनी वाच्यता केलेली नाही. प्रसारमाध्यमेच याविषयी गोंधळ निर्माण करत आहेत. काही असेल तर ते मी आणि पक्षाचे हायकमांड चर्चेद्वारे तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. आमदारांचा घोडेबाजार ही भाजपची संस्कृती आहे. यापूर्वी भाजप सरकार सथापन होताना त्या पक्षाने आमदार खरेदीसाठी किती हजार कोटी खर्च केले, मुख्यमंत्रिदासाठी किती पैसे द्यावे लागले, असा प्रश्नही शिवकुमार यांनी विरोधी पक्षाला उद्देशून केला.