For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीएड् कॉलेज पडताहेत बंद!

11:32 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीएड् कॉलेज पडताहेत बंद
Advertisement

79 कॉलेजीस बंद, केवळ 7 सुरू : शिक्षक भरती नसल्याने उदासीनता : अन्य क्षेत्रांची निवड

Advertisement

बेळगाव : रखडलेली शिक्षक भरती, वारेमाप शैक्षणिक शुल्क यामुळे विद्यार्थ्यांनी डीएड् अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील डीएड् कॉलेजच्या संख्येवर झाला आहे. मागील दहा वर्षात तब्बल 79 डीएड् कॉलेज बंद झाली आहेत. यामध्ये विनाअनुदानित डीएड् कॉलेजची संख्या सर्वाधिक आहे. मागील काही वर्षांपासून राज्य सरकारकडून शिक्षक भरतीसाठी चालढकल सुरू आहे. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जागा भरून घेतल्या जात आहेत. बेळगाव जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये मराठी माध्यमासाठी केवळ 70 ते 80 शिक्षक भरती करून घेण्यात आली. त्यातील काहींना अद्यापही अंतिम मंजुरीपत्र देण्यात आलेले नाही. या सर्व कारणांनी विद्यार्थी डीएड् अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

प्राथमिक व हायस्कूल स्तरावरील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी डीएड्-बीएड् अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 10 ते 12 वर्षांपूर्वी डीएड् उत्तीर्ण झालेल्यांना ताबडतोब नोकरी मिळत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी डीएड् अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. यामुळे विनाअनुदानित डीएड् कॉलेजची संख्या भरमसाट वाढली. मराठीसह इंग्रजी व कन्नड माध्यमाची डीएड् कॉलेज प्रत्येक शहरात सुरू झाली आहेत. परंतु, 2010 पासून राज्य सरकारने मर्यादित शिक्षक भरती सुरू केल्याने तेथून हळूहळू विद्यार्थ्यांचा कल बदलत गेला. दहा वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित 86 डीएड् कॉलेज होती. भरमसाट डोनेशन भरून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. परंतु, आता शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवू लागले. यामुळे एका मागून एक बीएड् कॉलेज बंद पडू लागली. सध्या जिल्ह्यात केवळ सात डीएड् कॉलेज कार्यरत आहेत. पाच अनुदानित तर दोन विनाअनुदानित डीएड् कॉलेज कशीबशी तग धरून आहेत.

Advertisement

उच्च न्यायालयात धाव

राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, टीईटी, सीईटी व त्यानंतर पात्र उमेदवार यांची यादी काढल्यानंतर 13,500 शिक्षकांची अंतिम यादी तयार झाली. दोन वर्षे या ना त्या कारणाने रखडलेली शिक्षक भरती दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाली. परंतु, काही विद्यार्थी उच्च न्यायालयात गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. अजून किती वर्षे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणार म्हणून अनेक विद्यार्थी इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत झाले आहेत.

मोजकीच डीएड् कॉलेज कार्यरत

दहा वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात 86 डीएड् कॉलेज पूर्ण क्षमतेने कार्यरत होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात विद्यार्थ्यांचा कल बदलल्याने अनेक डीएड् कॉलेज बंद झाली. सध्या जिल्ह्यात 5 अनुदानित तर 2 विनाअनुदानित डीएड् कॉलेज कार्यरत आहेत.

-एस. डी. गांजी, प्राचार्य, डाएट बेळगाव

Advertisement
Tags :

.