मुस्लीम देशांच्या डी-8ची होणार बैठक
इस्रायल विरोधात मांडला जाणार प्रस्ताव
वृत्तसंस्था/ कैरो
मुस्लीम देशांची संघटना डी-8 ची इजिप्तमध्ये गुरुवारी बैठक होणार असून यात पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया आणि तुर्कियेसमवेत 8 मुसलीम देशांचे नेते भाग घेणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील इजिप्तसाठी रवाना होणार आहेत. या बैठकीत मुस्लिम देशांकडून पॅलेस्टाइन, लेबनॉनचे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. याचबरोबर इस्रायलच्या विरोधात प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, जो सीरियातील सत्तापालटानंतर आणखी आक्रमक झालेल्या इस्रायलची निंदा करणारा असू शकतो. इस्रायलने गोलान टेकडी बागात ज्यूंची वस्ती दुप्पट करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. डी-8 च्या बैठकीत इराणचे अध्यक्ष मसूद पजेश्कियान देखील सहभागी होणार आहेत.
विकसनशील मुस्लीम देशांच्या या संघटनेचे नाव डी-8 आहे. या संघटनेत बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि तुर्किये सामील आहे. या देशांची एकूण लोकसंख्या सुमारे 125 कोटी इतकी असून जी जगभरातील मुस्लीम देशांच्या 60 टक्के इतकी आहे. विशेषकरून इराण, तुर्किये, मलेशिया आणि इंडोनेशिया यात सामील असल्याने हा अत्यंत मोठा गट ठरतो. यात सौदी अरेबियाचा समावेश नाही. यात सामील मुस्लीम देशांमध्ये अरब वंशीय देश म्हणजेच संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, इराक, सीरिया, कुवैत, कतार इत्यादी सामील नाहीत.
डी-8 संघटना सदस्य देशांदरम्यान ग्रामीण विकास, आर्थिक, बँकिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सहकार्य केले जाते. या गटाच्या पहिल्या परिषदेचे आयोजन जून 1997 मध्ये तुर्कियेत झाले होते. या संघटनेच्या थीमनुसार सामाजिक आणि आर्थिक विकास हाच अजेंडा आहे. याच्या अंतर्गत संवाद, विका, समानता, लोकशाही यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु सर्वसाधारपणे या परिषदेत मुस्लिमांशी निगडित मुद्देच उपस्थित केले जातात. यावेळी देखील सीरिया, पॅलेस्टाइनचे मुद्दे उपस्थित केले जाणार आहे. तसेच इस्रायलकडून गोलान टेकड्यांवरील कब्जावरून निंदेचा प्रस्ताव संमत होऊ शकतो.