पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा पुरस्कार
निकोशिया येथे प्रदान, सध्या युद्धाचे युग नसल्याचा केला पुनरुच्चार, सत्कारानंतर कॅनडाकडे प्रस्थान
वृत्तसंस्था / निकोशिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ माकारियस थर्ड’ या नावाने परिचित आहेत. हा पुस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम भारतीय नेते आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तो सर्व भारतीयांना अर्पण केला. माझा सन्मान हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात काढले.
आपल्या तीन देशांच्या दौऱ्याचा प्रथम भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी युरोपातील एक श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायप्रस येथे पोहचले. या देशाची राजधानी निकोशिया येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या देशातील भारतीय वंशाच्या समाजानेही त्यांचा मोठा सन्मान केला. सायप्रसचे अध्यक्ष निकोस खिस्टोडौलिडस यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.

उद्योग परिषदेत सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसमध्ये आयोजित उद्योजकांच्या गोलमेज परिषदेतही सहभाग घेतला. या वेळी त्यांच्यास सायप्रसचे अध्यक्षही होते. भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा आर्थिक देश होणार आहे. भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये आम्ही देशात पुढच्या पिढीतील सुधारणा घडविल्या आहेत. स्थिर आर्थिक धोरण, धोरण पारदर्शिता आणि साधनसंपत्तीची उपलब्धता यामुळे भारत आज जगाच्या गुंतवणूक आकर्षणाचे केंद्र बनला आहे, अशी भारताची भलावण त्यांनी आपल्या भाषणात केली.
भारतात गुंतवणुकीचे आवाहन
सायप्रस आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध ऐतिहसिक काळापासून आहेत. आज आपण एकमेकांचे दृढ आर्थिक भागिदार होऊ शकतो. भारतात सायप्रसच्या उद्योजकांनी गुंतवणूक करावी. भारत आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या काही काळातच आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहोत. आर्थिक सुधारणा वेगाने घडविण्याचे ध्येय आम्ही साध्य करत आहोत. भारत आणि सायप्रस यांची हातमिळवणी दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरु शकते. दोन्ही देशांचे हित यातून साधले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संरक्षण, तंत्रज्ञान विकास, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आदी क्षेत्रांमध्ये भारत आणि सायप्रस यांची भागीदारी परस्पर हिताची ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तुर्कियेला इशारा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात तुर्किया या देशाने उघडपणे भारताचा विश्वासघात करुन पाकिस्तानची बाजू घेतली होती. त्यानंतर भारताने तुर्कियेशी सर्व आर्थिक संबंध तोडले आहेत. सायप्रस आणि तुर्किये यांचाही इतिहासकाळापासून संबंध आहे. तुर्कियेने सायप्रसच्या उत्तरेकडचा काही भाग बळकाविला आहे. तेथे काश्मीरसारखी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सायप्रस दौऱ्याला महत्व दिले जात आहे. हा भारताने तुर्कियेला दिलेला गर्भित इशारा आहे, असे समजले जात आहे.
कॅनडाला प्रस्थान
सायप्रसचा एक दिवसाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाकडे प्रस्थान ठेवले आहे. कॅनडात ते जी-7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट होणार का, या संबंधात औत्सुक्य आहे. जी-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद मोदी यांचे भाषण होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
भारत शांततेचा पुरस्कर्ता
ड सायप्रसचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांच्याकडून भारतीय जनतेला अर्पण
ड दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला सायप्रस देशाचे ठाम समर्थन
ड शांततेच्या मार्गाने समस्या सोडविण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार