शानशान चक्रीवादळ जपानला धडकले
252 किमी प्रतितासाच्या वेगाने वाहिले वारे : भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/टोकियो
जपानमध्ये चालू वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ‘शानशान’ने धडक दिली आहे. शानशान चक्रीवादळ दक्षिण-पश्चिम बेट क्यूशूवर गुरुवारी सकाळी 8 वाजता पोहोचले. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होण्यासह 252 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शानशान या चक्रीवाळाला जपानमध्ये टायफून नंबर 10 नावाने ओळखले जात आहे. या चक्रीवादळामुळे अडीच लाखाहून अधिक घरांचा वीजपुरवठा रोखण्यात आला आहे. गामागोरी येथे भूस्खलन झाल्याने एक घर जमीनदोस्त झाले, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 2 जण जखमी झाले आहेत. या चक्रीवादळामुळे जपानमध्ये 10 लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कागोशिमा राज्यात 48 तासांमध्ये 1100 मिलिमीटर पाऊस पडण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रमाण पूर्ण वर्षात होणाऱ्या सरासरी पावसाच्या निम्म्याइतके आहे. अतिवृष्टीनंतर सत्सुमासेंडाई शहरानजीक भूस्खलन झाले आहे.
जपान सरकारने कागोशिमाच्या काही भागांमध्ये पाचव्या क्रमांकाच्या पातळीचा इशारा जारी केला आहे. हा देशात आपत्तीच्या काळात देण्यात येणारा सर्वात मोठा इशारा आहे. यात लोकांना घरात राहण्याचा आणि सखल भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेसेवा रोखण्यात आली असून बस तसेच अन्य वाहने चालविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. टोयोटा कंपनीने वादळाचा प्रभाव दूर होइपर्यंत जपानमधील स्वत:च्या सर्व 14 प्रकल्पांमधील उत्पादन रोखले आहे. जपानमध्ये यापूर्वी केवळ 3 वेण पाचव्या क्रमांकाच्या पातळीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जुलै 2014 मध्ये ओकिनावा प्रांतात एक शक्तिशाली वादळ दाखल झाले होते, तेव्हा पहिल्यांदा अशाप्रकारचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये ओकिनावामध्येच असा इशारा जारी करण्यात आला होता. तर सप्टेंबर 2022 मध्ये क्यूशू बेटावर हा इशारा जारी करण्यात आला होता.