रेमेल चक्रीवादळाचा जोर ओसरला
प. बंगालमध्ये नुकसान : दोघांचा मृत्यू : दमदार पर्जन्यवृष्टीचा इशारा : 21 तासांनी विमानसेवा सुरू
वृत्तसंस्था/ कोलकाता
धोकादायक रेमेल चक्रीवादळाने रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील पॅनिंग आणि बांगलादेशातील मोंगला येथे ताशी 135 किलोमीटर वेगाने धडक दिली. किनारपट्टी भागात या वाऱ्यांमुळे झाडे आणि विद्युतखांब मोडून पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र चक्रीवादळ सोमवारी सकाळी कमकुवत झाले. आता ते ताशी 15 किमी वेगाने ईशान्येकडे म्हणजेच बंगालला लागून असलेल्या त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि सिक्कीममध्ये सरकले असून त्याचा प्रभाव ओसरला आहे. मात्र, वादळामुळे पश्चिम बंगाल व्यतिरिक्त ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढील दोन दिवस दमदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रेमेल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील 15 हजार घरांचे नुकसान झाले आहे. राजधानी कोलकातामध्ये 100 हून अधिक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. रस्ते जलमय झाले होते. कोलकाता आणि सुंदरबनमध्ये दोघांचा मृत्यू झाला. किनारपट्टी भागातील 24 ब्लॉक आणि 79 वॉर्डांना फटका बसला. कोलकात्याच्या सुभाषचंद्र बोस विमानतळावर 21 तासांनंतर विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. वादळापूर्वी रविवारी दुपारपासून ते बंद होते. यादरम्यान 394 उ•ाणे रद्द करण्यात आली होती. तसेच रविवारपासून काही भागात बंद केलेली रेल्वेसेवाही पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी पहाटे 5.30 दरम्यान कोलकात्यात 146 मिमी पावसाची नोंद झाली. हल्दियामध्ये 110 मिमी, तमलूकमध्ये 70 मिमी आणि निमेथमध्ये 70 मिमी पाऊस झाला आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, पूर्व मेदिनीपूर, दिघा, काकडद्वीप, जयनगर, कोलकाता, हुगळी आणि हावडा या किनारपट्टीच्या भागात पाऊस पडला. उंच आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. वादळानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 15 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटवली जात असल्याचे कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी सांगितले.
आसाममध्ये पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट
पश्चिम बंगालमध्ये रेमेल वादळाच्या तडाख्यामुळे आसामच्या 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका कायम असून लोकांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बांगलादेशात 7 बळी
बांगलादेशातही या वादळाचा जबरदस्त प्रभाव दिसून आला. ढाक्मयाच्या सोमोय टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात वादळामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे साधारणपणे चार तास चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. यादरम्यान सरकारने दीड कोटी लोकांच्या घरांची वीज खंडित केली होती. चक्रीवादळाच्या काळात 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते.