For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रागासा चक्रीवादळाची हाँगकाँगमध्ये धडक

06:58 AM Sep 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
रागासा चक्रीवादळाची हाँगकाँगमध्ये धडक
Advertisement

हाँगकाँगमध्ये अनेक उड्डाणे रद्द : तैवानमध्ये दळणवळण विस्कळीत

Advertisement

वृत्तसंस्था/ हाँगकाँग

चालू वर्षातील ‘रागासा’ हे सर्वात धोकादायक वादळ मंगळवारी रात्री हाँगकाँगमध्ये धडकले. या वादळावेळी ताशी 200 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला. वादळाची तीव्रता जास्त असल्यामुळे हाँगकाँग सरकारने किनाऱ्यावरील लोकांना आधीच स्थलांतरित केले होते. ‘रागासा’चा परिणाम तैवान आणि चीनपर्यंत जाणवत आहे. तैवानमध्ये वादळामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. 129 लोक बेपत्ता आहेत. चीनने किनारी भागातून 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. येथे 100 लोक बेपत्ता आहेत. हवामान विभागाने ‘रागासा’ला ‘वादळांचा राजा’ असे म्हटले आहे. ‘रागासा’ हा फिलिपिनो शब्द असून त्याचा अर्थ ‘वेडा’ असा आहे.

Advertisement

हाँगकाँगच्या फुलरतन हॉटेलमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. त्सुंग क्वान आणि लांटाऊ बेटावरील विमानतळाजवळील समुद्रकिनारे पुरामुळे उद्ध्वस्त झाले. हाँगकाँग विमानतळावरही वादळाचा परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे हजारो प्रवासी अडकले. शहराच्या मेट्रो आणि बस सेवादेखील विस्कळीत झाल्या. अनेक भागात पाणी साचल्याने दुकाने आणि घरांचे नुकसान झाले. तैवानमध्ये परिस्थिती आणखी गंभीर असून मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. खराब हवामानामुळे सैन्य आणि बचाव पथकांना अडचणी येत आहेत. अनेक भागात वीज आणि दळणवळण सेवा विस्कळीत झाल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चीनकडूनही रेड अलर्ट जारी

चीनमधील शेन्झेन आणि ग्वांगझू सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये लक्षावधी लोक राहतात. या सर्वांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. चीनच्या ग्वांगझू प्रांताच्या किनाऱ्याजवळ पोहोचेपर्यंत वादळाची तीव्रता कायम राहण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते जमिनीवर धडकण्याची अपेक्षा आहे. चीनच्या ग्वांगझू प्रांतात 20 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्वांगझू आणि शेन्झेन सारख्या प्रमुख शहरांमध्ये शाळा, वाहतूक आणि हवाई सेवा बंद आहेत.

Advertisement
Tags :

.