For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोंथा चक्रीवादळाचा जोर ओसरला

07:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोंथा चक्रीवादळाचा जोर ओसरला
Advertisement

नेपाळपर्यंत मजल : उत्तर प्रदेश-बिहारमध्ये पाऊस : आंध्रात तिघांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मोंथा चक्रीवादळ आता हळूहळू कमकुवत होत आहे. तथापि, अनेक राज्यांमध्ये त्याचा परिणाम जाणवत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पाऊस सुरू आहे. दरम्यान, नेपाळमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. नेपाळ हवामान खात्याने 26 जिह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. मोंथा चक्रीवादळाचा परिणाम शनिवारपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

चक्रीवादळ मोंथामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला असून 42 गुरे-ढोरे मृत्युमुखी पडली. तसेच सुमारे दीड लाख एकर क्षेत्रातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. तेलंगणाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. सूर्यपेटमध्ये झाड कोसळल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. खम्मम जिह्यातही एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ आणि कानपूरसह 15 शहरांमध्ये पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिह्यांमध्येही पाऊस पडला. भोपाळ, इंदूर आणि उज्जैनमध्ये जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात घट झाली. गुरुवारी सकाळी जयपूर, अलवर आणि करौलीसह राजस्थानच्या अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान तापमानातही घट झाली.

नेपाळमध्ये मोंथा चक्रीवादळाचा परिणाम

नेपाळमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्याने 26 जिह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. कोशी, मधेश आणि बागमती प्रांतातील नद्यांच्या पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. विभागाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यंत आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा आणि संवेदनशील भागातील लोकांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मनांग जिह्यात मुसळधार बर्फवृष्टीनंतर नेपाळी सैन्याने 1,500 हून अधिक पर्यटकांना वाचवले.

आंध्रात वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी 11,000 कर्मचारी तैनात

चक्रीवादळ मोंथा दरम्यान राज्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 11,000 हून अधिक वीज विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बऱ्याच भागात झाडांची पडझड झाल्याने वीजखांबही कलंडले आहेत. आता वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कार्यरत करण्यात आल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव के. विजयानंद यांनी सांगितले. चक्रीवादळावेळी नऊ सबस्टेशन (220 केव्ही), चार (400 केव्ही) आणि अकरा (132 केव्ही) मध्ये समस्या आल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात आली. मुसळधार पाऊस असूनही वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत.

Advertisement
Tags :

.