मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नई तामिळनाडूत मुसळधार पाऊस
बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले चक्रीवादळ मिचॉन्ग आज तीव्र चक्री वादळ बनल्यानंतर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग आज दुपारनंतर कधीही आंध्र प्रदेशातील बापटला धडकू शकते. दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव यापूर्वीच दिसून आला आहे. विशेषतः तामिळनाडू आणि पुद्दुचेरीला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे मुसळधार पावसानंतर विविध कारणांमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे सोमवारी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चक्रीवादळामुळे रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 'मिचॉन्ग' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.