केरळमध्येही फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव
5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट : शाळा बंद ठेवण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
भारतीय हवामान विभागाने सोमवारी फेंगल चक्रीवादळामुळे केरळमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा जारी केला आहे. केरळमध्ये बहुतांश क्षेत्रांमध्ये पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे. तर मंगळवारी राज्याच्या उत्तर आणि मध्य भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांपर्यंत केरळमध्ये पाऊस पडत राहणार असल्याचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे.
केरळमधील कासरगोड, कन्नूर, वायनाड, कोझीकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांकरता अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. राज्याचे महसूल मंत्री के. राजन यांनी अतिवृष्टीचा इशारा पाहता लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन पेले आहे.
कुठल्याही ठिकाणासाठी रेड अलर्टचा अर्थ 24 तासांमध्ये 20 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असा होतो. याचबरोबर ऑरेंज अलर्ट 11 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटरपर्यंतचा पाऊस दर्शवितो. यलो अलर्ट 3 सेंटीमीटर ते 11 सेंटीमीटरपर्यंतच्या पावसाचा इशारा देणारा असतो.
कासरगोडमध्ये जिल्हा प्रशासनाने मंगळवारी महाविद्यालये, ट्यूशन सेंटर्स, अंगणवाडी, मदरशांसमवेत सर्व शैक्षणिक संस्थांसाठी सुटी जाहीर केली आहे. परंतु प्रशासनाने मॉडेल निवासी शाळा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट पेले आहे. यापूर्वी पथनामथिट्टा, इडुक्की, कोट्टायम आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये सोमवारी सर्व शैक्षणिक संस्थांकरता सुटी जाहीर करण्यात आली होती.
तामिळनाडूच्या विल्लुपुरममध्ये पूर
फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील विल्लुपुरम पुराला तोंड देत आहे. तामिळनाडूचे उत्तर किनारी क्षेत्र आणि पु•gचेरीत चक्रीवादळाचा प्र्रभाव सोमवारी कमी झाला. तर विल्लुपुरम आणि आसपासच्या गावांमध्ये पूरसंकट निर्माण झाले आहे. एका पुलावर पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने रेल्वेने सोमवारी अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा केली.
पुड्डु चेरीत नुकसानाची पाहणी
फेंगल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत एक विस्तृत अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे पुड्डु चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे केंद्रशासित प्रदेशातील जनजीवन प्रभावित झाले आहे. पूरग्रस्त भागांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली आहे. तर अतिवृष्टीमुळे केंद्रशासित प्रदेशात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे.