For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेंगल चक्रीवादळात चार राज्ये प्रभावित

06:50 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
फेंगल चक्रीवादळात चार राज्ये प्रभावित
Advertisement

तामिळनाडू-पुद्दुचेरीला धडक : शाळा-कॉलेजसह चेन्नई विमानतळ बंद; एकाचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ शनिवारी पुद्दुचेरीतील कराईकल आणि तामिळनाडूतील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले.  तामिळनाडूत 90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही दिसून येत आहे. चेन्नईत पावसामुळे अनेक विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या आणि सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शनिवारी रात्रभर याचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Advertisement

फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पुद्दुचेरीवर परिणाम होत आहे. तामिळनाडू सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. येथे अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नागापट्टिनममध्ये 800 एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असून अजूनही वादळाचा प्रभाव कायम आहे. तामिळनाडूमध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये 30 सैनिक ठेवण्यात आले आहेत.

चेन्नईत शनिवारी मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. याचदरम्यान शॉर्टसर्किट होऊन विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. शहरातील अनेक उ•ाणांवरही परिणाम झाला आहे. चेन्नई विमानतळावरील वाहतूक सुरुवातीला शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही मुदत रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत वाढवल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते. तसेच अनेक रेल्वेगाड्याही नियोजित वेळेपासून उशिराने धावत होत्या. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कु•ालोर, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, चेन्नई आणि मायिलादुथुराई जिह्यात शनिवारी शाळा आणि महाविद्यालये बंद राहिली. या जिह्यांतील लोकांनाही घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता.

तामिळनाडूमध्ये कामेश्वरम, विरुंधमावाडी, पुडुपल्ली, वेद्रप्पू, वनमादेवी, वल्लापल्लम, कल्लीमेडू, एरावोयल आणि चेंबोडी जिह्यांमध्ये 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कु•ालोर, विल्लुपुरम, कल्लाकुरिची आणि मायिलादुथुराई येथे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आपत्ती निवारण विभागाचे जवान बाधित भागात वाहनांद्वारे अन्न आणि पिण्याचे पाणी पुरवत आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 112 आणि 1077 टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तसेच 2 हजार मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत.  कार्यालयात ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रकिन्रायालगतच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

आंध्रप्रदेश, पुद्दुचेरीही वादळाच्या विळख्यात

आंध्रप्रदेशमधील नेल्लोर, चित्तूर, विशाखापट्टणम आणि तिरुपतीला फेंगल वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे ताशी 50-60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. मच्छीमारांनाही नौकाविहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचले आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडितही झाला आहे. येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील बंद करण्यात आली आहेत. पोलीस आणि पीडब्ल्यूडी विभागाला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

सौदी अरेबियाकडून ‘फेंगल’ नामकरण

दक्षिण किनारपट्टील धडकलेल्या वादळाचे ‘फेंगल’ हे नाव सौदी अरेबियाने सुचवले आहे. हा अरबी शब्द असून भाषिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख यांचे मिश्रण आहे. हा शब्द जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या नामकरण पॅनेलमधील प्रादेशिक फरक प्रतिबिंबित करतो.

Advertisement
Tags :

.