‘दाना’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये चौघांचा मृत्यू
ओडिशात 1.75 लाख एकरातील पिके नष्ट, बिहार-झारखंडमध्ये पाऊस, तापमानात घट
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर, कोलकाता
बंगालच्या उपसागरातून देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या ‘दाना’ चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही काही प्रमाणात दिसून येत आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये चौघांचा बळी गेल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. पूर्व वर्धमान, दक्षिण 24 परगणा, कोलकाता आणि हावडा येथे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, ओडिशात कोणीही मरण पावले नाही, परंतु पाऊस आणि वादळामुळे 1.75 लाख एकर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत.
ओडिशा सरकारने चक्रीवादळापूर्वी 6 ते 8 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविल्यामुळे तेथे जीवितहानी टळली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालनंतर ‘दाना’ चक्रीवादळाची वाटचाल आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि तामिळनाडूच्या दिशेने सुरू झाली. या वादळाच्या प्रभावामुळे बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस सुरूच आहे. झारखंडमध्ये तापमान 6 अंशांनी घसरले आहे. तर बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये पुढील 24 तास पावसाची शक्मयता आहे.
बिहार-झारखंडमध्येही पाऊस
ओडिशात केंद्रपारा, भद्रक आणि बालासोर जिह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटले आहेत. त्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दक्षिण बंगालमधील 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होता. कोलकात्यात शुक्रवारी 24 तासांत 4 इंच पाऊस झाला. तथापि, हवाई आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे. वादळामुळे जवळच्या झारखंड आणि बिहार राज्यांमध्येही पाऊस पडत आहे.