For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस कनेक्शन तोडण्याच्या धमकीद्वारे सायबर गुन्हेगारांचा ग्राहकांना गंडा

12:34 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅस कनेक्शन तोडण्याच्या धमकीद्वारे सायबर गुन्हेगारांचा ग्राहकांना गंडा
Advertisement

सतर्क राहण्याचे सीईएन पोलिसांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : सायबर गुन्हेगारीचा विस्तार दिवसेंदिवस झपाट्याने होतो आहे. आता स्थानिक संस्थांच्या नावानेही फसवणुकीचे प्रकार सुरू असून रविवारी दिवसभरात मेघा गॅस कंपनीच्या नावाने अनेक ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बेळगाव येथील अनेक ठिकाणी भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून गॅसपुरवठा केला जातो. मेघा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रा. लि. ही कंपनी गॅसपुरवठा करते. याच कंपनीच्या नावाने ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात आली आहे. शहर सीईएन विभागाकडे सोमवारी पाचहून अधिक जणांनी तक्रारी केल्या आहेत. मेघा गॅस ग्राहकांच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, ‘तुम्ही जुने बिल भरले नाही. त्यामुळे आज रात्री नऊ वाजेपर्यंत तुमची गॅस जोडणी तोडण्यात येईल’ असा तो मेसेज असतो. गॅस कनेक्शनच रद्द होणार, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यामुळे ग्राहकांची धावपळ उडाली. अनेक जण बिले भरण्यासाठी तयार झाले.

भामट्यांनी ग्राहकांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यातील रक्कम गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वत: मेघा गॅस कंपनीनेही यासंबंधी खुलासा केला असून आमच्याकडून लगेच रक्कम भरा, अशा आशयाचे मेसेज कोणत्याही ग्राहकांना पाठविण्यात आले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला आहे. शहर सीईएन विभागाचे पोलीस उपअधीक्षक जे. रघु व पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गॅस कंपनीच्या नावाने मेसेज पाठवून ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत आहे. असा प्रकार लक्षात आल्यास लगेच सायबर क्राईम विभागाच्या 1930 हेल्पलाईनला किंवा शहर सीईएन विभागात माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.