For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर गुन्हेगारांची आता थेट धमकी

01:02 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायबर गुन्हेगारांची आता थेट धमकी
Advertisement

मोबाईल हॅक करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार : मित्र-नातेवाईकांचीही सतावणूक

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

देशभरातील कोट्यावधी मोबाईल हॅक होणार, अशी भीती केंद्रीय यंत्रणांनी व्यक्त केल्या पाठोपाठ बेळगावात हॅकिंगचे प्रकार सुरू झाले आहेत. या प्रकाराने नागरिक हैराण झाले असून सायबर गुन्हेगार थेट धमकी देऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत बेळगाव परिसरात हॅकिंगचे अनेक प्रकार घडले आहेत.

Advertisement

मोबाईल ग्राहकांच्या नकळत त्यांच्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती हॅक होऊ शकते, असा इशारा केंद्र सरकारच्या भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला होता. मोबाईल कंपन्यांनाही यासंबंधीची माहिती देण्यात आली होती. हॅकिंग थोपविण्यासाठी कंपन्यांकडून सेक्युरिटी पॅच येऊ लागले आहेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच हॅकिंगचे प्रकार सुरू झाले आहेत.

अँड्रॉईड मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करणाऱ्यांचा डाटा हॅक होऊ लागला आहे. देशभरातील सुमारे 1 कोटीहून अधिक मोबाईल हॅकिंगचा इशारा देण्यात आला आहे. अनगोळ येथील एका तरुणाला दोन दिवसांपासून याचा फटका बसला आहे. सायबर गुन्हेगार केवळ त्या तरुणालाच नव्हे तर त्याचे मित्र व नातेवाईकांनाही छळू लागले आहेत.

रविवारी दुपारी अनगोळ येथील एका तरुणाला एक कॉल आला. ‘तुम्ही बँकेतून कर्ज काढले आहे. ते कर्ज भरा नाही तर तुमच्या संपकील व्यक्तींना माहिती पाठवून तुम्ही फ्रॉड आहात याची जाणीव करून देऊ’ असे धमकाविण्यात आले. त्यावर युवकाने आपण कुठल्याच बँकेतून कर्ज काढलेले नाही. त्यामुळे ते भरण्याचा प्रश्न कुठून येतो? असा सवाल उपस्थित केल्यानंतर लगेच त्याच्या संपकील कुटुंबीय व मित्रांना फोन कॉल येऊ लागले आहेत.

अशा प्रकारांमुळे केवळ तो युवकच नव्हे तर त्याच्याशी संबंधित कुटुंबीय व मित्रांचीही डोकेदुखी वाढली आहे. यासंबंधी सायबर क्राईम विभागाला माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांनंतरही सायबर गुन्हेगारांचे कॉल सुरूच असून या गुन्हेगारांनी एक आव्हानच उभे केले आहे.

स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपच तयार

तुमच्या मित्राने कर्ज घेतले आहे. घेतलेले कर्ज त्याने भरले नाही. त्यामुळे तुम्ही भरा’ अशी मागणी केली जात आहे. काहीजणांच्या व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह छायाचित्रेही पाठविण्यात आली आहेत. सोमवारी तर ज्या तरुणाच्या मोबाईलमधून माहिती हॅक झाली आहे, त्याच्या फोटोखाली ‘ही व्यक्ती फ्रॉड आहे, त्याने बँकेतून घेतलेले कर्ज भरले नाही’ असा मजकूर तयार करून त्याच्याशी संबंधित व्यक्तींना पाठविण्यात आले आहे. यासाठी सायबर गुन्हेगारांनी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपच तयार केला आहे.

Advertisement
Tags :

.