एटीपी सेवा बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय
वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ
प्रतिनिधी / बेळगाव
वीजबिल भरण्यासाठी हेस्कॉमची एटीपी सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे वीजग्राहकांना हेस्कॉम कार्यालय अथवा बेळगाव वनमध्ये जाऊन वीजबिल भरावे लागत आहे. सोमवारी रेल्वेस्थानक येथील हेस्कॉम कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. बिल भरण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागल्या. त्यामुळे अतिरिक्त काऊंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.
हेस्कॉमने विजेचे बिल भरण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या भागात एटीपी सेंटर सुरू केली होती. शहापूर, गोवावेस, खासबाग, रेल्वेस्टेशन, नेहरुनगर, खंजर गल्ली यासह इतर भागात एटीपी सेंटर सुरू होती. परंतु, एटीपीची सुविधा देणाऱ्या कंपनीचे कंत्राट संपल्याने सेवा स्थगित झाली. मागील दहा दिवसांपासून एटीपी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना हेस्कॉम कार्यालयातच जाऊन बिल भरावे लागत आहे.
रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयासोबतच नेहरुनगर कार्यालयातही बिल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती. बऱ्याच कंपन्यांचे वीजबिल धनादेशाद्वारे भरले जात असल्याने बिल भरण्यासाठी बराच कालावधी लागत होता. त्यामुळे गर्दीवेळी हेस्कॉमने एखादे अतिरिक्त काऊंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. एटीपी सेवा बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका महिला व वयोवृद्ध ग्राहकांना बसत आहे.
| वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन हेस्कॉमच्या कार्यालयांमध्ये वीजबिल भरले जाऊ शकते. त्याचबरोबर बेळगाव वन व कर्नाटक वन कार्यालयातही बिल स्वीकारले जात आहे. ज्या ग्राहकांना कार्यालयापर्यंत जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेस्कॉमच्या वेबसाईटसोबतच पेटीएम, गुगल पे, फोन पे, एअरटेल पे यासह इतर मोबाईल वॉलेटमधून वीजबिल भरण्याची सुविधा हेस्कॉमकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिल भरण्यासाठी गर्दी न करता ऑनलाईन विजेचे बिल भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |