Sangli : सध्याचे राजकारण हे प्रवाही, कधी काय होईल सांगता येत नाही ! : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
औदुंबर येथे यांत्रिक बोटीचे लोकार्पण : आ. विश्वजीत कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
भिलवडी : पलूस तालुक्यातील कृष्णा काठावरील पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे व संकटाच्या काळात सरकार आणि स्थानिक लोक सर्व मिळून काम करतात. हवामान खात्याने मार्च-एप्रिल महिन्यात केलेला अंदाज खोटा ठरला, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र सरकारने तात्काळ मदतीचा निर्णय घेतला व ते शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले तर सद्याचे राजकारण हे प्रवाही राजकारण बनले आहे. राजकारणात कधी काही होईल सांगता येत नाही, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगाव, राडेवाडी बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे, सुखवाडी, अंकलखोप या गावांना यांत्रिक बोटीचा लोकार्पण सोहळा औदुंबर येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. विशाल पाटील, आ.डॉ. विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्म्राट महाडिक, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे.के. जाधव, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना एकूण ४१ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून सुमारे ६५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यावेळी पलूस तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश नव्हता, पण शासनाने विचार करून त्याचा समावेश केला आहे. पूरस्थिती कायमस्वरूपी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, आ. विश्वजीत कदम आणि खा. विशाल पाटील हे वारंवार मला 'पालकमंत्री म्हणून लक्ष द्या' असे सांगतात, म्हणजे कदाचित त्यांनाही आमच्यात येण्याचा विचार असावा. खा. विशाल पाटील म्हणाले, महापुरात २००५ साली स्व.कदम साहेबांनी आपल्या मंत्री पदावरून फार मोठी मदत केली. तर २०१९ च्या महापुरात आ. विश्वजीत कदम यांनी जबाबदारी घेऊन महापुरातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले व त्यांना धीर देण्याचे काम केले.
आता ब्रम्हनाळसारख्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने यांत्रिक बोटी निर्माण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. आता जि.प. व पं.स. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या होईपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा पुण्यात जाऊन राहावे. त्यांच्यामुळे आम्हाला फार मोठे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विश्वजीत कदम आणि माझे दोघांचे पालकत्व चंद्रकांतदादांनी स्वीकारावे व भरघोस निधी देण्यात कोणताही दुजाभाव करू नये.
आ.कदम म्हणाले, औदुंबर येथे हजारो लोक दत्त मंदिर दर्शनासाठी येतात. १८८० साली औदुंबरमध्ये पहिली सर्कस आली होती. या गावाला समृद्ध साहित्याचा इतिहास आहे. १०० वर्षानंतर, २००५ साली कृष्णा नदीला महापूर आला, तेव्हा माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी भरीव मदत करून लोकांचे जीवनमान उंचावले.
मात्र त्यानंतर एवढा महापूर येईल असे कोणालाच बाटले नव्हते. २०१९ साली पुन्हा महापुरामुळे कृष्णा काठावर मोठे संकट उभे राहिले. त्या काळात रात्रंदिवस काम करून ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. ब्रम्हनाळसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी डीपीडीसीकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळाले. पालकमंत्र्यांची मदत फार मोठी होती.
यावेळी प्रांतधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी राजेश कदम, प्रशांत माने, सुरेखा राक्षे, बाळासो यादव, योगिता शिंदे, दीपाली काळे, प्रल्हाद जाधव, ओंकार पाटील, अमर बडार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. कदमांची सारवासारव
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या कालावधीमध्ये चार महिने राजीनामा तर द्यावा नाहीतर पुण्याला जावे, अशी विनंती खा. विशाल पाटील यांनी केली. त्यावरती मिश्किल करून आ. विश्वजीत कदम यांनी सारवा सारव केली.