For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्णायक लढतीच्या निकालाची उत्सुकता

06:37 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्णायक लढतीच्या निकालाची उत्सुकता
Advertisement

निर्णायक लढतीच्या निकालाची उत्सुकता

Advertisement

कोकणात लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला आहे. मात्र, यावेळची लोकसभा निवडणूक अनेकांच्यादृष्टीने कसोटीची, राजकीय भवितव्याची, अस्तित्वाची, निर्णायक तसेच कोकणवर खरी पकड कोणाची हे सांगणारी आहे. बॅ. नाथ पै यांच्या काळात निकालाची फार उत्सुकता असायची. तीच उत्सुकता यावेळच्या निवडणुकीत आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निर्णायक लढ्याच्या निकालाकडे कोकण व राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवार  रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट आहे. या मतदारसंघात एकूण 62.29 टक्के मतदान झाले. याचा फायदा कोणाला होणार, याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. विशेष करून भाजप पक्ष, मोदी कार्ड, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गट, मनसे आणि स्वत: राणेंची ताकद अशी ताकद नारायण राणेंच्या पाठिशी आहे. तर विनायक राऊत यांना दोन्ही जिल्ह्यांतील मजबूत शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि राऊत यांचा स्वत:चा दांडगा जनसंपर्क यापैकी कोणती बलस्थाने प्रभावी ठरणार अन् कोणाला तारणार, याची राजकीय चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे कोकणातील निर्णायक लढ्याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

Advertisement

या मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महायुतीतर्फे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात मुख्य लढत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन असे मिळून सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी या चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर महायुतीच्या राणेंचे पारडे जड दिसत आहे. मात्र, वाढलेला मतदानाचा टक्का सत्ताधाऱ्यांच्यादृष्टीने धोक्याची घंटा असते, असे म्हटले जाते. महाविकास आघाडीचे म्हणजेच राऊतांच्या बाजूचे राजापूर व कुडाळ-मालवणचे दोन आमदार आहेत व स्वत: विद्यमान खासदार राऊत आहेत. महाविकास आघाडीचे राजकीय पारडे कागदावर तरी जड दिसत नाही. मात्र, कोकणातील हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राजकीय फाटाफुटीत कोकणातून धनुष्यबाण हे चिन्ह गायब झाले, तरी लोकांमध्ये शिवसेनेबद्दल आतून सुप्त सहानुभुती आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सहानुभूती मिळाली, तर राजकीय पारड्यापेक्षा सहानुभूतीचे पारडे जड जाऊ शकते. असे असले, तरी यावेळी नेमका निकाल काय लागू शकतो हे सांगणे अवघड असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

या मतदारसंघात राणेंची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याने महायुती प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात काहीशी मागे राहिली होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच भाजपची पूर्ण यंत्रणा सक्रीय झाली. मायक्रो प्लानिंग करून त्यांनी वातावरण निर्मितीसह मतांची गोळा-बेरीज करण्याचे प्रयत्न केले. तुलनेत राऊत यांच्याकडून भावनिक प्रचारावर अधिक भर देण्यात आला होता. या मतदारसंघात संघटनात्मकदृष्ट्या सिंधुदुर्गात भाजप, तर रत्नागिरीत शिवसेना ठाकरे गट मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे आपल्या भागात जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्याबरोबरच प्रतिस्पर्धांच्या प्रभाव क्षेत्रात त्यांची मते कमी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने करण्यात आले.

अल्पसंख्याक, मराठा, ओबीसी मते मिळविण्याची सर्कस दोन्हींकडून केली गेली. त्यातही महिला, नोकरदार, मध्यमवर्गीय, मच्छीमार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मेळावे, सभा, संपर्क मोहिमा राबविण्यात आल्या. या मतदारसंघात प्रामुख्याने सव्वालाख मुस्लिम मतदार आहेत. मच्छीमारांची संख्याही मोठी आहे. ही मते निर्णायक ठरण्याच्या शक्यतेने आपल्याकडेच वळविण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाला.

या मतदारसंघात रत्नागिरी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शिंदे शिवसेना गटाचा प्रभाव आहे. या मतदारसंघाचे आमदार असलेले मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत तसेच त्यांचे बंधू किरण सामंत हे राणेंच्या प्रचारात दिसले. परंतु ग्राऊंड लेव्हलला शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रियपणे प्रचारात उतरल्याचे दिसून आले नाही. ही भूमिका भाजपसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणेंचा प्रचार मायक्रोप्लानिंग करून केला. सत्ताधारी म्हणून असलेले बळ, सिंधुदुर्गातील संघटनात्मक ताकद, राणेंची वैयक्तिक राजकीय ताकद हे राऊत यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. दुसरीकडे राऊत यांनी भावनिक प्रचारावर भर दिला. विनाशकारी प्रकल्प असा आरोप करून या प्रकल्पाविरोधात प्रचारात भूमिका मांडली. जनसंपर्क हा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. एकूणच रत्नागिरीत शिवसेना आणि सिंधुदुर्गात भाजपला मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 68 हजार 199 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 लाख 39 हजार 419 मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 28 हजार मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांची जी बलस्थाने आहेत, ती कोणाला तारणार हे पाहावे लागणार आहे. त्यासाठी 4 जूनला होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

नारायण राणे हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एक मंत्री म्हणून निवडणूक जिंकण्याची मोठी प्रतिष्ठेची लढाई आहेच. मागील दोन निवडणुकांत त्यांचा सलग दोनवेळा पराभव झालेला आहे. पराभवाच्या हॅट्ट्रिकला ब्रेक लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 1992 पासूनचा हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यावेळी भाजपने आपल्याकडे खेचून आणत ही जागा मिळविली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कमळ फुलविण्याचेही मोठे आव्हान आहे. जर कमळ फुलले, तर कोकणच्या इतिहासात लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजपचे खाते उघडणार आहे. राणेंचे कोकणवरील वर्चस्व सिद्ध होणार आहे. त्यामुळे राणेंसाठी ही निवडणूक कसोटीची आणि अस्तित्वाचीच ठरणार आहे.

ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासाठीही निवडणूक अस्तित्वाच्या लढाईची आहे. सलग दोनवेळा विजयी झालेल्या राऊतांसमोर विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचे मोठे आव्हान आहे. कारण मागील दोन निवडणुकीत भाजपचा पाठिंबा होता. मात्र, आता शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर तो पाठिंबा राहिलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत असली, तरी भाजप सोबत नाही. शिवसेनेतही दोन गट पडल्याने ताकद विभागली गेली. धनुष्यबाण चिन्ह नसल्याने मशालीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणेही कसोटीचे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदे शिवसेनेने या मतदारसंघाची जागा भाजपला सोडल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी ठाकरेसेनेकडून तरी कोकणवर आपल्या पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

कोकणातील दुसऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात लढत होत आहे. या दोघांमध्येही तुल्यबळ लढत होत आहे.

दोघांच्याही प्रचार सभा चांगल्याच गाजल्या आणि मतदानानंतर दोघांनीही मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निर्णायक लढ्याच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.